शिदगाव-आनंदनगर उपोषणानंतरही कामे बंद; ग्रामस्थांचा संताप अनावर असोसे-असोळेतील ‘जल जीवन मिशनचा ''आका'' मयूर नामक कोण? चौकशीची मागणी"
गौरव शेलार / मुरबाड : तालुक्यातील शिदगाव-आनंदनगर
ग्रामपंचायत हद्दीतील जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात
ग्रामस्थांनी दिनांक 16 जून 2026 रोजी
आमरण उपोषण छेडले होते. या उपोषणादरम्यान संबंधित ठेकेदार व प्रतिनिधींनी
ग्रामस्थांशी चर्चा करून दिनांक 18 जून 2026 पर्यंत रखडलेली कामे सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र 21
जून उजाडूनही प्रत्यक्षात कामांना सुरुवात न झाल्याने
ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामस्थांच्या मते, उपोषण मागे घेण्यासाठी दिलेले
लेखी आश्वासन केवळ वेळ मारून नेण्याचा प्रकार ठरला असून, ठेकेदारांनी
ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराची विश्वासार्हता
संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, "आश्वासन देऊनही काम न
करणारा ठेकेदार जनतेची फसवणूक करत आहे का?" असा सवाल
उपस्थित केला जात आहे.
ग्रामस्थांनी असा
आरोप केला आहे की,
जल जीवन मिशन अंतर्गत अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता,
निकृष्ट दर्जाची कामे आणि आर्थिक अफरातफर झाली असून, यामागे काही प्रभावशाली व्यक्तींचे पाठबळ असल्याची चर्चा परिसरात सुरू
आहे. विशेषतः "जल जीवन मिशनचा
आका म्हणून ओळखला जाणारा मयूर नामक व्यक्ती नेमका कोण?"
याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली
आहे.
स्थानिक नागरिकांच्या
म्हणण्यानुसार,
संबंधित ठेकेदार आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणांनी केवळ
शिदगाव-आनंदनगरच नव्हे तर इतर गावांमध्येही केलेल्या कामांची तांत्रिक व आर्थिक
चौकशी जिल्हास्तरावर करण्यात यावी. कामांचे मोजमाप, निधी
खर्च, प्रत्यक्ष कामांची स्थिती आणि गुणवत्तेची तपासणी करून
सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे.
यासोबतच ग्रामस्थांनी
संबंधित ठेकेदाराची संस्था किंवा सोसायटी काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावी, जल
जीवन मिशनमधील सर्व कामांची विशेष चौकशी समितीमार्फत तपासणी करावी आणि जर आर्थिक
गैरव्यवहार अथवा अफरातफर आढळून आली तर संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल
करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात असोसे-असोळे परिसरातील जल जीवन मिशनचा कथित ‘आका’ म्हणून चर्चेत असलेला मयूर नामक व्यक्ती नेमका कोण? त्याचा प्रकल्पांशी काय संबंध आहे? आणि त्याच्या माध्यमातून कोणत्या कामांना मंजुरी अथवा नियंत्रण दिले जात आहे का? अशा प्रश्नांची चर्चा आता ग्रामस्थांमध्ये उघडपणे सुरू झाली आहे.
ग्रामस्थांनी
प्रशासनाला इशारा देत सांगितले की, लेखी आश्वासन देऊनही कामे
सुरू होत नसतील आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम राहणार असेल, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन, पंचायत समिती आणि संबंधित विभाग या गंभीर आरोपांची दखल घेऊन काय भूमिका
घेतात, याकडे संपूर्ण मुरबाड तालुक्याचे लक्ष लागले आहे.



No comments