web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडमध्ये बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट; आरोग्य यंत्रणा मात्र गप्प ! ; चार वर्षे बेकायदेशीर रिपोर्ट देणाऱ्या लॅबवर कारवाई कधी?...

 

मुरबाड : मुरबाड शहर व तालुक्यात अनेक पॅथॉलॉजी लॅब नियमांना हरताळ फासत सुरू असल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून,या प्रकरणाकडे आरोग्य विभाग आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा संताप व्यक्त होत आहे. मुरबाड नगरपंचायतीची परवानगी नसताना, अधिकृत नोंदणी नसताना आणि वैद्यकीय नियमांचे उल्लंघन करून अनेक लॅब वर्षानुवर्षे सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.विशेष म्हणजे,एका लॅबने तब्बल चार वर्षे कोणतीही वैध नोंदणी नसताना रुग्णांचे रक्त व इतर वैद्यकीय नमुन्यांच्या चाचण्या करून रिपोर्ट दिल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर चार ते सहा महिन्यांपूर्वी घाईघाईत नोंदणी करण्यात आल्याची चर्चा आहे. जर ही बाब खरी असेल, तर मागील चार वर्षांत देण्यात आलेले हजारो रिपोर्ट बेकायदेशीर ठरत नाहीत का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.या लॅबमध्ये एम.डी. डॉक्टरांची सही छापील स्वरूपात वापरली जात असल्याचीही चर्चा असून, प्रत्यक्ष डॉक्टरांच्या उपस्थितीशिवाय रिपोर्ट दिले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.याहून गंभीर बाब म्हणजे अनेक ठिकाणी डीएमएलटीचे विद्यार्थी अत्यल्प मानधनावर टेक्निशियन म्हणून काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. महिन्याला केवळ पाच ते सात हजार रुपये देऊन त्यांच्याकडून पूर्णवेळ काम करून घेतले जात असल्याने या विद्यार्थ्यांची आर्थिक आणि व्यावसायिक पातळीवर घोर फसवणूक होत असल्याचा आरोप आहे.दरम्यान, काही लॅब चालकांनी डॉक्टर, क्लिनिक आणि हॉस्पिटल यांना आर्थिक व्यवहारांच्या जाळ्यात अडकवून ठेवले असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. महिन्याच्या कमिशनच्या माध्यमातून रुग्ण पाठविण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा मलिन होत आहे.

या संदर्भात अनेक तक्रारी विविध विभागांकडे करण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत असल्याचा दावा केला जातो, मात्र बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅबच्या बाबतीत ही पथके नेमकी कुठे गायब झाली आहेत? असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.रुग्णांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पत्रकार कुणाल शेलार यांनी केली आहे.

तसेच जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर बनसोडे यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून मुरबाडमधील सर्व संशयित लॅबची विशेष तपासणी मोहीम राबवावी, संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी आणि नियमबाह्य आढळणाऱ्या लॅबवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर लॅबवर प्रशासनाचा हात आहे की वरदहस्त?कारवाई होणार की पुन्हा एकदा तक्रारींच्या फायली धूळ खात पडून राहणार? याकडे संपूर्ण मुरबाड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments