विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद; ‘चेहरा पडताळणी’द्वारेच प्रवेश
गौरव शेलार / मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, २२ जून २०२६ पासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होत असून यंदाच्या अधिवेशनात प्रथमच पारंपरिक छापील प्रवेशपत्रिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. यापुढे पीठासीन अधिकारी, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, अधिकारी-कर्मचारी, स्वीय सहायक, पत्रकार तसेच अभ्यागतांसह सर्वांना ‘चेहरा पडताळणी पद्धती’ (Face Recognition System) द्वारेच विधान भवनात प्रवेश दिला जाणार आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने दिली आहे.
अधिवेशन काळात विधान भवन परिसरातील गर्दी नियंत्रित ठेवणे, सुरक्षा व्यवस्थेला अधिक सक्षम करणे आणि प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता आणणे या उद्देशाने छापील पासऐवजी ई-प्रवेश प्रणालीवर आधारित चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आली आहे.
या नव्या व्यवस्थेनुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, सर्व अधिकारी-कर्मचारी, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी, सचिव, विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहायक तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यांना ऑनलाईन नोंदणी करूनच प्रवेश मिळणार आहे.
विधानमंडळ सचिवालयाकडून संबंधित सर्व विभागांना ई-ऑफिस प्रणालीद्वारे आवश्यक सूचना पाठविण्यात आल्या असून ई-मेलच्या माध्यमातून माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ही प्रक्रिया २० आणि २१ जून या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे.
यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने जारी केले असून सर्व संबंधितांनी नव्या ई-प्रवेश प्रणालीचा स्वीकार करून सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन सचिवालयातर्फे करण्यात आले आहे.
यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळीन कामकाजासाठीच नव्हे, तर तंत्रज्ञानाधारित सुरक्षा व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठीही विशेष ठरणार आहे.

.jpeg)

No comments