लेखी संमतीशिवाय स्मार्ट व टीओडी मीटर बसवू नका; अन्यथा आंदोलन छेडू राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा महावितरणला इशारा
गौरव
शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यात स्मार्ट मीटर व टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर
बसविण्याच्या हालचालींना वेग आला असताना, सर्वसामान्य ग्राहकांची लेखी संमती न घेता हे मीटर बसविण्यात आल्यास तीव्र
आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दिला आहे.
यासंदर्भात
पक्षाच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विजय धर्मसारे यांना निवेदन
देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
मुरबाड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी,
शेतमजूर व कष्टकरी वर्ग आधीच महागाई, बेरोजगारी
आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटर व
टीओडी मीटरमुळे वीजबिलांचा अतिरिक्त आर्थिक भार नागरिकांवर पडण्याची भीती व्यक्त
करण्यात आली आहे.
पक्षाच्या
पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, स्मार्ट मीटर आणि टीओडी मीटर योजना ही सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी
नसून मोठ्या उद्योगपतींना आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविली जात
असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्याही ग्राहकाच्या लेखी
संमतीशिवाय अशा प्रकारचे मीटर बसविण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस
(शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे, तालुका सरचिटणीस नामदेव गायकवाड, उपाध्यक्ष गुरूनाथ गोल्हे, काशिनाथ माळी, मुरबाड शहराध्यक्ष तेजस व्यापारी, युवक अध्यक्ष अभिषेक
डुंकवाल, सेवादल अध्यक्ष शिवाजी नवले, शहर
सरचिटणीस भाविक उन्ने, लव दुधाळे, स्वप्नील
मार्के यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मार्ट
मीटर आणि टीओडी मीटरबाबत तालुक्यात नागरिकांमध्ये विविध शंका व संभ्रम निर्माण
झाल्याने हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, येत्या काळात यावरून राजकीय वातावरण आणखी
तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



No comments