जल जीवन मिशनचा निधी ''आका मयूर'' च्या घशात? पावसाळी अधिवेशनात मुद्दा गाजणार का?
गौरव शेलार / मुरबाड
:
केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण
भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात
आले आहे. मात्र मुरबाड तालुक्यातील शिदगाव-आनंदनगर
परिसरातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचा आरोप
ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या
म्हणण्यानुसार,
या भागात जल जीवन मिशन अंतर्गत विविध कामे मंजूर झाली, निधीही खर्च झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण
असून नागरिकांच्या नळातून अद्याप पाणी आलेले नाही. त्यामुळे "योजनेचा निधी
नेमका कुठे गेला?" असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित
करत आहेत.
विशेष म्हणजे, परिसरात
जल जीवन मिशनच्या कामांबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात असून, नागरिकांकडून "जल जीवन मिशनचा आका म्हणून ओळखला जाणारा मयूर नामक व्यक्ती नेमकी कोण?"
याबाबत चौकशीची मागणी केली जात आहे. या व्यक्तीचा कामांशी काय संबंध
आहे, निधीच्या वापरात त्याची कोणती भूमिका आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, पावसाळा
सुरू झाला असला तरी शिदगाव-आनंदनगरमधील अनेक कुटुंबांना नियमित पाणीपुरवठ्याची
प्रतीक्षा कायम आहे. महिलांना आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत
करावी लागत असल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
काही दिवसांपूर्वी
ग्रामस्थांनी आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग अवलंबून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा
प्रयत्न केला होता. मात्र अद्यापही ठोस तोडगा न निघाल्याने नागरिकांचा संताप वाढत
आहे. त्यामुळे आगामी पावसाळी
अधिवेशनात हा मुद्दा गाजणार का? याकडे
सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांची मागणी
आहे की,
जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या सर्व कामांची स्वतंत्र तांत्रिक
चौकशी करण्यात यावी, खर्चाचा हिशेब सार्वजनिक करण्यात यावा
आणि दोषी आढळणाऱ्या अधिकारी, ठेकेदार किंवा संबंधित
व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी.आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर
प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहतात, तसेच नागरिकांना
प्रत्यक्ष पाणी कधी मिळते, याकडे शिदगाव-आनंदनगरवासीयांचे
लक्ष लागले आहे.



No comments