web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड शहरात मान्सूनपूर्व तयारीला वेग; १७ प्रभागांतील नाल्यांची मोठ्या प्रमाणावर साफसफाई

 

गौरव शेलार / मुरबाड : येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरबाड नगरपंचायतीने शहरातील मान्सूनपूर्व तयारीला गती दिली असून मुख्य नाले तसेच अंतर्गत गटारांच्या साफसफाईची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील सर्व १७ प्रभागांमध्ये ही कामे एकाच वेळी सुरू असून नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील प्रमुख नाल्यांची यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात येत आहे. विशेषतः जेसीबीच्या सहाय्याने गटारांमधील साचलेला तब्बल ७० टन गाळ बाहेर काढण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढल्यामुळे नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढणार असून, पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका कमी होणार आहे.

यासोबतच शहरातील सर्व प्रभागांमधील लहान-मोठ्या गटारांची साफसफाई आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सफाई कामगारांकडून घराजवळील गटारी, रस्त्यालगतचे नाले यांची काटेकोरपणे स्वच्छता केली जात आहे. या मोहिमेमुळे शहरातील स्वच्छतेचा स्तर उंचावण्यासही मदत होणार आहे.

मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी स्वतः या कामांवर लक्ष ठेवून विविध ठिकाणी पाहणी केली आहे. “पावसाळ्यात शहरातील कोणताही भाग पाण्याखाली जाणार नाही, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नाले तुंबू नयेत यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनीही गटारांमध्ये कचरा टाकू नये, तसेच स्वच्छतेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या पुढाकारामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुरबाड शहरात पाणी तुंबण्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणावर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

No comments