web-banner-lshep2024

Breaking News

बारामतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत हालचाली; राज्यसभेसाठी प्रमोद हिंदुराव यांच्या नावाची जोरदार मागणी

 

गौरव शेलार / मुरबाड : महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती मतदारसंघातील घडामोडींनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा जागेवरून नवीन समीकरणे पाहायला मिळत आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी पक्षातील ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुराव यांना संधी द्यावी, अशी जोरदार मागणी महाराष्ट्रातील शेतकरी महिला आघाडी, तसेच राज्यातील सामाजिक संघटनाच्या वतीने करण्यात आली आहे.

शेतकरी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रमोद हिंदुराव हे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सुनेत्रा पवार यांच्या अत्यंत विश्वासू व जवळच्या वर्तुळातील नेते म्हणून ओळखले जातात. अजित पवार कुटुंबीयांशी त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय संबंध अतिशय निकटचे असून पक्षनिष्ठा आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विशेष म्हणजे, अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीपासून निःस्वार्थीपणे साथ देणाऱ्या नेत्यांमध्ये प्रमोद हिंदुराव हे आघाडीवर होते. कठीण राजकीय परिस्थितीतही त्यांनी पक्षाशी आणि नेतृत्वाशी निष्ठा कायम ठेवली, याची दखल घेतली जावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

प्रमोद हिंदुराव यांची ओळख केवळ राजकीय नेते म्हणून नाही, तर सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्याच्या रूपातही आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांची त्यांना सखोल जाण असून शेतकरी, महिला आणि कामगारांच्या समस्या त्यांनी सातत्याने मांडल्या आहेत. पीकविमा योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पाणीटंचाई यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.

तसेच, महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, कामगारांच्या हक्कांसाठी लढा आणि ग्रामीण भागात वैद्यकीय शिबिरांचे आयोजन अशा माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे राज्यसभेसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर अशा अनुभवी आणि अभ्यासू नेत्याला संधी मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या मागणीवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, बारामतीतील राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडीसाठी कोणाला संधी मिळते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

No comments