अवैध धंद्यांचा बाजार उठवा नाहीतर गृहमंत्री हटवा! मुरबाडमध्ये नागरिकांचा संताप; मटका-गुटखा धंदा तेजीत, यंत्रणा मात्र सुस्त
मुंबई : मुरबाड शहरासह ग्रामीण भागात सध्या अवैध धंद्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मटका, गुटखा, अवैध दारू, अड्डे आणि इतर बेकायदेशीर धंदे दिवसाढवळ्या सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “अवैध धंद्यांचा बाजार उठवा नाहीतर गृहमंत्री हटवा” अशा संतप्त घोषणा आता सर्वसामान्य नागरिकांकडून दिल्या जात असून प्रशासनाविरोधात रोष वाढताना दिसत आहे.
स्थानिकांच्या मते, मुरबाड शहरातील काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत मटका आणि गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलांपर्यंत गुटखा सहज पोहोचत असून युवक व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत. काही भागांत जुगार अड्डेही सुरू असल्याची चर्चा असून संबंधित यंत्रणा मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.
नागरिकांनी सांगितले की, पोलिस प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. “सामान्य नागरिकांवर नियमांचा बडगा उगारला जातो; मात्र अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि पालकवर्गानेही चिंता व्यक्त करत म्हटले की, गावोगावी वाढणारे हे अवैध धंदे तरुण पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत. प्रशासनाने तातडीने संयुक्त कारवाई मोहीम राबवून मटका, गुटखा आणि इतर बेकायदेशीर धंदे कायमस्वरूपी बंद करावेत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, मुरबाडमधील वाढत्या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी आता थेट गृहमंत्रालयाकडे लक्ष वेधत कठोर पावले उचलण्याची मागणी केली असून येत्या काळात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



No comments