मुरबाड शहराला विकासाचा नवा चेहरा; ब्रिजखाली बंदिस्त गार्डन व्हावे स्वतंत्र संपादक पत्रकार संघटना यांची मागणी
गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड शहराचा चेहरामोहरा दिवसेंदिवस बदलत असून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. शहरात उभारण्यात आलेल्या भव्य ब्रिजमुळे मुरबाडला आधुनिक आणि आकर्षक असा नवा लुक प्राप्त झाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या अथक प्रयत्नांतून मतदारसंघात विकासाची गंगा वाहताना दिसत आहे. रस्ते, पूल, सुविधा आणि शहर सुशोभीकरणाच्या कामांमुळे मुरबाड शहर आता भविष्याची दिशा बदलणारे शहर म्हणून ओळख निर्माण करू लागले आहे.
मुरबाड नगरपंचायतही विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात अग्रस्थानी राहण्याचा प्रयत्न करत असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. “विकासाची नांदी सर्वत्र घुमत आहे, बांधले जात आहे आणि जोडले जात आहे,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः मुरबाडला कल्याणशी जोडणारा नवीन ब्रिज हा शहराच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
दरम्यान, या ब्रिजखालील मोकळ्या जागेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी आता नागरिकांमधून मोठी मागणी पुढे येऊ लागली आहे. ब्रिजखाली सुंदर आणि आधुनिक बंदिस्त गार्डन उभारण्यात यावे, अशी मागणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाने केली असून यासंदर्भात कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या अधिपत्याखाली सदर बंदिस्त गार्डन प्रस्ताव संबंधीत प्रशासनाला तात्काळ सादर करावे म्हणून निवेदन देण्यात आले आहे. ही मागणी आता सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही जोर धरू लागली आहे.
प्रस्तावित बंदिस्त गार्डनमुळे मुरबाड शहराला आणखी आकर्षक आणि पर्यावरणपूरक ओळख मिळू शकते. शहरातील वाढती लोकसंख्या आणि धावपळीच्या जीवनात नागरिकांना विरंगुळ्यासाठी सुरक्षित व सुंदर जागा उपलब्ध होणे काळाची गरज मानली जात आहे. या गार्डनमध्ये लहान मुलांसाठी विविध मनोरंजन साधने, खेळण्यासाठी सुरक्षित झोके, स्लाईड्स, ओपन प्ले झोन आदी सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकतात. त्यामुळे मुलांना आनंददायी वातावरण मिळण्यास मदत होईल.
तसेच युवकांसाठी सेल्फी पॉइंट, ओपन जिम, वाचन कट्टा, हरित परिसर आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी छोटेखानी मंच उभारण्यात आल्यास सामाजिक उपक्रमांना चालना मिळू शकते. महिलांसाठी सुरक्षित फिरण्याची व्यवस्था, बसण्याची सुविधा आणि आकर्षक उद्यान परिसर तयार झाल्यास हा भाग शहरातील एक प्रमुख आकर्षण ठरू शकतो.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वॉकिंग ट्रॅक, योगा व ध्यान केंद्र, आरामदायी आसन व्यवस्था आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. यामुळे नागरिकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होणार असून शहरात सामाजिक एकोपा आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
विशेष म्हणजे, ब्रिजखालील रिकामी जागा सुशोभिकरणासाठी वापरल्यास अस्वच्छता, अतिक्रमण आणि गैरप्रकारांनाही आळा बसू शकतो. पर्यावरण संवर्धनास चालना मिळून शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर बनण्यास मदत होईल. त्यामुळे मुरबाड शहराच्या विकासात हा बंदिस्त गार्डन प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
मुरबाड शहर विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत असताना आता या बंदिस्त गार्डनच्या मागणीला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशा मागणीसह आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



No comments