पाण्यासाठी चिखले ग्रामस्थांचा संताप उफाळला;जलजीवन मिशनची योजना वादाच्या भोवऱ्यात ठेकेदारावर ''आका''चा हात?
गौरव शेलार / मुरबाड : चिखले (वढू) गावात सध्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात निष्प्रभ ठरल्याने गावकऱ्यांचा संताप आता उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे. गावात पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना प्रशासन मात्र केवळ आश्वासनांपुरते मर्यादित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या विरोधात ग्रामपंचायतीच्या सरपंच मालती दिपक हरड यांनी ग्रामस्थांसोबत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करत प्रशासनाला थेट धारेवर धरले.
कोट्यवधींची योजना; पण गाव तहानलेलेच जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावासाठी नदीपात्रात विहीर बांधण्यात आली होती. मात्र, योग्य नियोजनाचा अभाव आणि निकृष्ट कामांमुळे ही योजना सुरुवातीपासूनच वादात राहिली. आता उन्हाळ्याच्या तीव्रतेत विहिरीतील पाणीपातळी इतकी खालावली आहे की मोटार पंपालाही पाणी मिळेनासे झाले आहे. परिणामी गावातील नळ कोरडे पडले असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांच्या मते, संबंधित ठेकेदाराला काही अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्यामुळे निकृष्ट काम असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात रोष अधिकच वाढला आहे.
वारंवार मागण्या; तरीही प्रशासन ढिम्म : ग्रामपंचायतीकडून अनेक वेळा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या. कोकण आयुक्त कार्यालयालाही छायाचित्रांसह संपूर्ण माहिती देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. “पाणी हा आमचा हक्क आहे, उपकार नाहीत,” अशी भावना आंदोलनस्थळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने गावातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
लेखी आश्वासनानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती : आंदोलन तीव्र होत असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी अस्तित्वातील विहिरीचे खोलीकरण तातडीने करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर सरपंच मालती हरड यांनी ग्रामस्थांच्या संमतीने उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र, “आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन उभे करू,” असा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.
ग्रामीण भागातील वास्तव पुन्हा समोर : चिखले गावातील ही परिस्थिती ग्रामीण भागातील योजनांच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. कागदोपत्री योजना पूर्ण झाल्याचे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांना मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.



No comments