web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडमध्ये गुटखा-मटका माफियांचे साम्राज्य; कायद्याला खुलं आव्हान, प्रशासन मौनात!

ठाणे  : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आज एक भयंकर वास्तव समोर येत आहे . राज्यात गुटख्यावर बंदी असताना मुरबाडमध्ये मात्र गुटखा माफियांचा सुळसुळाट सुरू आहे. गावोगावी पानटपऱ्यांवर, किराणा दुकानांत आणि काही गुप्त अड्ड्यांवर खुलेआम गुटखा विकला जात असून कायद्याची भीतीच उरलेली नाही. राज्यात गुटख्यावर बंदी, जुगारावर कायदेशीर निर्बंध असतानाही मुरबाडमध्ये मात्र खुलेआम विष आणि जुगाराचा बाजार भरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

राज्य सरकार एकीकडे आरोग्य मोहिमा राबवत असताना दुसरीकडे मुरबाडमध्ये तरुण पिढीला कर्करोगाच्या खाईत ढकलणारा अवैध धंदा भरदिवसा सुरू आहे. काही ठिकाणी रात्रीच्या अंधारात लाखो रुपयांचा माल उतरवला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. एवढेच नव्हे तर “मोठ्या आशीर्वादाशिवाय हा धंदा चालू शकत नाही,” अशी कुजबुजही परिसरात ऐकायला मिळत आहे.

पोलीस आणि प्रशासन झोपले आहे का?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कारण अल्पवयीन मुलांच्या हातात सहज गुटख्याच्या पुड्या दिसत आहेत. शाळा आणि कॉलेज परिसरात व्यसनाचे विष विकले जात असताना संबंधित यंत्रणा मात्र शांत असल्याचा आरोप होत आहे.

गावोगावी पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि गुप्त अड्ड्यांवरून गुटख्याची विक्री सुरू असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे गल्लीबोळात मटका अड्डे सुरू असून अनेक कुटुंबांची आर्थिक वाताहत होत असल्याची खंत स्थानिक व्यक्त करत आहेत. “तरुणाई व्यसनात अडकली आणि गरीब मटका खेळून उद्ध्वस्त झाला,” अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे हे सर्व सुरू असताना संबंधित यंत्रणा कारवाई करताना दिसत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. “कायद्याचा धाक उरलाच नाही का?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची चर्चा असून, स्थानिकांकडून कठोर चौकशीची मागणी केली जात आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते गुटखा हा कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांना आमंत्रण देतो, तर मटका हा अनेक कुटुंबांच्या संसाराचा घातक शत्रू ठरत आहे. व्यसन आणि जुगारामुळे युवकांचे भविष्य अंधारात जात असल्याची भीती पालक व्यक्त करत आहेत.राज्यात FDA आणि पोलिसांकडून वेळोवेळी गुटखा विरोधात कारवाया होत असल्या तरी ग्रामीण भागात अवैध धंदे सुरूच आहेत.

No comments