“कंत्राटी भरतीत घोटाळा? केडीएमसीमध्ये सफाई कामगारांवर अन्यायाचा आरोप”
कल्याण : सफाई कामगारांवर अन्याय होणं ही काही नवीन बाब नसली तरी सध्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मध्ये सुरू असलेल्या कंत्राटी भरती प्रक्रियेमुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देणार्या जुन्या कामगारांना वगळून नव्या कामगारांना पैसे घेऊन प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदारांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेत काही मध्यस्थांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, नाना नावाचा इसाम कामगारांची भरती करून देण्यासाठी दलाली करत असल्याचे बोलले जात असून तसे आरोप सुद्धा कामगारांकडून करण्यात येत आहेत.
जुन्या कामगारांनी संताप व्यक्त करत सांगितले की, आम्ही वर्षानुवर्षे कमी वेतनात काम करूनही आता आमच्यावर अन्याय केला जात आहे. आमची जागा पैशाच्या जोरावर नव्या लोकांना दिली जात आहे.या प्रकरणामुळे केडीएमसी प्रशासनावरही प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित अधिकार्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. कामगार संघटनांनी या प्रकाराची
सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, नाना नावाच्या व्यक्तीचा नेमका कोणाशी संबंध आहे? त्यामागे कोणते मोठे जाळे कार्यरत आहे? याचा उलगडा होणे अत्यंत गरजेचे आहे.



No comments