web-banner-lshep2024

Breaking News

व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांचाच मनमानी कारभार?; मुरबाडच्या मुख्य बाजारपेठ भररस्त्यावर लाल मिरची सुकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात खुले नाट्यगृहासमोरील एका व्यापाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित व्यापारी हा भरवर्दळीच्या सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लाल मिरची सुकण्यासाठी टाकत असल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला आणि स्थानिक नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे संबंधित व्यापारी हा व्यापारी संघटनेचा अध्यक्ष असल्याची चर्चा असून आपल्या पदाचा गैरवापर करून तो नियमांना हरताळ फासत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. सामान्य व्यापाऱ्यांवर नियम लावले जात असताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारे सार्वजनिक त्रास निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, लाल मिरची रस्त्यावर टाकल्यानंतर परिसरात तिखट वास आणि ठसका पसरतो. यामुळे अनेकांना डोळ्यांची जळजळ, घशात आग, श्वास घेण्यास त्रास आणि सतत खोकल्याचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हामध्ये या त्रासाची तीव्रता अधिक वाढत असून शाळकरी विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.

सदर रस्ता हा मुख्य बाजारपेठेतील अत्यंत वर्दळीचा मार्ग असल्याने दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत सार्वजनिक रस्त्यावर लाल मिरची सुकवणे हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी अनेक वेळा संबंधित व्यापाऱ्याला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापारी आपल्या पदाचा दबाव वापरत मनमानीपणे व्यवसाय करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता नगरपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध विभागाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

“सार्वजनिक रस्ता हा कोणाच्या खासगी मालकीचा नाही. नागरिकांच्या जीविताशी आणि आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 

No comments