web-banner-lshep2024

Breaking News

ठाणे ग्रामीणच्या पोलीस दलात नवी धडाकेबाज एन्ट्री; पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड ठरणार गुन्हेगारांचा कर्दनकाळ; आगमनानेच गुन्हेगारांमध्ये धडकी

 

गौरव शेलार / मुरबाड,ठाणे : ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाला अखेर नवे नेतृत्व मिळाले असून कर्तव्यदक्ष, कठोर आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले डॉ. विनयकुमार राठोड यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यभरात विविध ठिकाणी काम करताना पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी कठोर प्रशासन, जलद कारवाई आणि गुन्हेगारांविरोधातील आक्रमक भूमिका यामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये त्यांनी केलेल्या धाडसी कारवायांची चर्चा पोलीस विभागात आजही केली जाते. त्यामुळे ठाणे ग्रामीणमध्ये त्यांची नियुक्ती ही केवळ प्रशासकीय बदल नसून गुन्हेगारीविरोधातील मोठी मोहीम मानली जात आहे.

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात मागील काही महिन्यांत अवैध धंदे, मटका, दारू तस्करी, वाळू माफिया, जमीन व्यवहारातील फसवणूक, वाढते चोरीचे प्रकार आणि काही भागांतील संघटित गुन्हेगारी यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत डॉ. राठोड यांच्या नेतृत्वाकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिल्याची माहिती समोर येत आहे.

“गुन्हेगार कोणताही असो, त्याला कायद्यापुढे झुकावेच लागेल,” असा स्पष्ट संदेश पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी आपल्या पहिल्याच भूमिकेतून दिल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे अनेक अवैध धंदे चालविणाऱ्यांनी आतापासूनच सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे ग्रामीण भागातील आदिवासी पट्टे, दुर्गम गावे आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाढणारे गुन्हे रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. सायबर गुन्हे, महिलांवरील अत्याचार, अमली पदार्थांची तस्करी आणि टोळक्यांची दादागिरी यावर कठोर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या आगमनामुळे पोलीस दलातही नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रामाणिक आणि काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठबळ देत निष्क्रियतेवर कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात ठाणे ग्रामीण पोलीस दल अधिक आक्रमक आणि जनतेसाठी तत्पर दिसणार असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या पोलीस अधीक्षकांचे स्वागत करत ठाणे ग्रामीण गुन्हेमुक्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. दुसरीकडे गुन्हेगारी जगतात मात्र “राठोड पॅटर्न”ची चर्चा सुरू झाली असून अनेक गुन्हेगारांनी आपले बस्तान हलवण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

 

No comments