ऑनलाइन औषध विक्रीविरोधातील 20 मे रोजी देशव्यापी बंदला मुरबाड तालुक्याचा पाठिंबा; राधेश्याम मेडिकल रुग्णसेवेसाठी सुरू
गौरव शेलार / मुंबई : देशभरातील
साडेबारा लाखांहून अधिक केमिस्ट आणि औषध विक्रेत्यांनी ऑनलाइन औषध विक्री तसेच
बेकायदा औषध विक्रीच्या विरोधात 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे.
या आंदोलनात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील केमिस्ट संघटना सहभागी होणार असून
पारंपरिक मेडिकल व्यवसाय वाचवण्यासाठी हा लढा असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले
आहे.
रिटेल अँड
डिस्पेन्सिंग केमिस्ट असोसिएशनच्या मुंबई विभागाचे खजिनदार प्रवीण व्यास यांनी
सांगितले की,
ऑनलाइन औषध विक्रीमुळे स्थानिक मेडिकल स्टोअर्सच्या व्यवसायावर
गंभीर परिणाम होत आहे. ई-फार्मसी कंपन्यांकडून 20 ते 50
टक्क्यांपर्यंत सवलती दिल्या जात असल्याने पारंपरिक औषध विक्रेते
आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक ठिकाणी छोट्या मेडिकल दुकानदारांचे अस्तित्व
धोक्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर
नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री होत असल्याचा गंभीर आरोपही संघटनांनी केला आहे.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे उपलब्ध करून दिली जात असल्याचा दावा करत, गर्भपातासंदर्भातील
संवेदनशील औषधेही सर्रास विकली जात असल्याचे प्रवीण व्यास यांनी म्हटले आहे. अशा
औषधांच्या अनियंत्रित वापरामुळे महिला आणि मुलींच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण
होऊ शकतो. त्यामुळे सरकारने ऑनलाइन औषध विक्रीवर कठोर निर्बंध आणावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
“हा
बंद सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी नसून नियमबाह्य औषध विक्रीविरोधातील आंदोलन
आहे,” असेही प्रवीण व्यास यांनी स्पष्ट केले. औषध
विक्रीसंदर्भातील नियम अधिक कठोर आणि पारदर्शक असावेत, तसेच
ऑनलाइन विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी मागणी
संघटनांनी केली आहे.
दरम्यान, ऑल
इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे सदस्य विलास जोशी यांनी बनावट
औषधांचा वाढता धोका, नियंत्रण यंत्रणेतील त्रुटी आणि
नियमांमधील शिथिलतेवर आक्षेप घेतला. योग्य नियंत्रण नसल्यास भविष्यात आंदोलन आणखी
तीव्र करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.
या देशव्यापी बंदमुळे
अनेक शहरांमधील औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता असून सामान्य नागरिकांना औषध
उपलब्धतेवर काही प्रमाणात परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र रुग्णसेवा
विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष तयारी सुरू केली आहे. दरम्यान, बंदमुळे
नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
मुरबाड शहरातील राधेश्याम मेडिकल हे रुग्णांच्या सेवेसाठी
उपलब्ध राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक औषधांची
गरज लक्षात घेऊन रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ही सुविधा सुरू
ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.



No comments