web-banner-lshep2024

Breaking News

अनोळखी मृतदेह प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; ठाणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी

 

गौरव शेलार / ठाणे : दहागाव परिसरात सापडलेल्या अनोळखी मृतदेह प्रकरणाचा ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.२६ एप्रिल २०२६ रोजी दहागाव येथील मोकळ्या मैदानाजवळील शेतात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे हात-पाय बांधलेले असून शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी वारसिद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

        घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी तात्काळ तपासासाठी विशेष पथके नियुक्त केली. अपर पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गीते यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.तपास पथकात पोलीस अधिकारी व अंमलदार म्हणून पोलीस उपनिरीक्षक महेश कदम ,रोहन शेलार, भाऊसाहेब गायकवाड, सफौ  प्रकाश  साईल ,धनाजी कडव, पोलीस हवा. संतोष सुर्वे, गोविंद कोळी, उमेश ठाकरे, हनुमान गायकर ,सतीश कोळी ,हेमंत विभुते ,संदीप तांडेल ,शशिकांत पाटील, दीपक गायकवाड, रवींद्र मोरे, योगेश शेळकंदे, जितेंद्र वारके, स्वप्निल बोडके, सुरेश धिंदळे यांनी अथक परिश्रम घेत ही कामगिरी यशस्वी केली.

तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि मिसिंग व्यक्तींची माहिती तपासून मृताची ओळख शमशाद अली वारिश अली (वय ३५) अशी पटविण्यात आली.तपासादरम्यान समोर आले की, पैशांच्या वादातून हा खून करण्यात आला. मृताने आरोपीकडून घेतलेले पैसे परत न केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. याच रागातून आरोपींनी त्याचे अपहरण करून मारहाण केली आणि धारदार शस्त्राने खून केला.या प्रकरणी सय्यद हसन सय्यद मेहबूब बादशहा आणि समीर अब्दुल करीम कल्याणकर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

ठाणे ग्रामीण पोलिसांनी जलद आणि समन्वयित तपास करून हा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणला असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

No comments