झरिया इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित “गौ सेवा सन्मान व गौ सेवा वाहन लोकार्पण समारंभ संपन्न
मुरबाड : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दुहेरी औचित्याने मुरबाड नगरीत गौसेवेच्या पवित्र कार्याला समर्पित एक दिमाखदार आणि भावपूर्ण सोहळा पार पडला. महाराष्ट्र रत्न सन्मानित पूज्य श्रीगुरु डॉ. माजिद पैठणकर यांच्या प्रेरणेतून झरिया इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित “गौ सेवा सन्मान व गौ सेवा वाहन लोकार्पण समारंभ” हा कार्यक्रम श्रीगुरु गौ आश्रम, जुनी क्रांती टॉकीजजवळ, शिव तलाव परिसर येथे उत्साहात संपन्न झाला.
या मंगल प्रसंगी मुरबाडचे तहसीलदार अभिजीत भाऊसाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते गौ सेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या वाहनाचे (ट्रक) लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पणामुळे गौसंवर्धनाच्या कार्याला नवी चालना मिळाली असून, झरिया ऑर्गनायझेशनच्या सेवाभावी उपक्रमांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.लोकार्पित करण्यात आलेले हे वाहन गौ आचार्य पंडित नितेश वैष्ठा यांच्या स्वाधीन करण्यात आले. सासणे गावातील त्यांच्या गौशाळेत ५०० हून अधिक गायींची निस्वार्थ सेवा केली जाते. या वाहनाच्या माध्यमातून चारा वाहतूक, आपत्कालीन मदत व गायींच्या संरक्षणासाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते महाराष्ट्र रत्न श्रीगुरु (डॉ.) माजिद पैठणकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. एक करिष्माई आध्यात्मिक गुरु व समाजहितैषी व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी शांतता, सद्भावना व मानवतेचा संदेश जागतिक पातळीवर पोहोचवला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने गौरविले आहे. तसेच, युनेस्को चेअर (भारत) तर्फे त्यांची ‘ग्लोबल अॅम्बेसेडर ऑफ पीस’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या भव्य समारंभात तहसीलदार अभिजीत देशमुख यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने गौसेवेत अहोरात्र योगदान देणाऱ्या कामगारांचा विशेष गौरव करून त्यांना वस्त्र भेट देण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची अर्थपूर्ण जोड लाभली. गौसंवर्धन व सनातन मूल्यांच्या जतनासाठी झरिया ऑर्गनायझेशनचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून, समाजात सेवाभाव जागृत करणारा आहे.
या सोहळ्यास ठाणे जिल्ह्यातील दानशूर व्यक्तिमत्व महेबूबभाई पैठणकर, रिपाइंचे अध्यक्ष दिनेश उघडे, मंदार महाजन, पत्रकार दिलीप पवार, सामाजिक कार्यकर्ते साजीदभाई पैठणकर, झरिया इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे महाअधिकारी रणवीर पार्थ, तसेच श्रीगुरु गौ संवर्धन – बजरंग सेना, मुरबाडचे अध्यक्ष विघ्नेश शिर्के यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments