दोन सीबीएसई शाळांविरोधात गंभीर तक्रार; शिक्षण विभाग कारवाई करणार का?
पडघा,भिवंडी : रिद्धी सिद्धी जनाई एज्युकेशन सोसायटी संचलित आर. के. पालवी स्कूल आणि श्री लॉर्ड गणेश स्कूल (CBSE) या दोन शाळांविरोधात गंभीर स्वरूपाची लेखी तक्रार शिक्षण विभागाकडे दाखल करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी थेट संबंधित असलेल्या या प्रकरणामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शाळांकडून शासकीय नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शाळांमध्ये आवश्यक त्या मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याचे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे तसेच शिक्षणाच्या दर्जाबाबत पालकांची दिशाभूल केली जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सीबीएसई पद्धतीच्या नावाखाली पालकांकडून मोठ्या प्रमाणात फी आकारली जात असल्याचीही चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
तक्रारदारांनी शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनात शाळांच्या मान्यताप्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पायाभूत सुविधा, शिक्षकांची पात्रता तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सोयी-सुविधांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन वास्तव परिस्थिती तपासावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर अद्याप शिक्षण विभागाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसल्याने संशय अधिक गडद होत आहे. “तक्रार दाखल होऊनही कारवाई का होत नाही?”, “चौकशी दाबली जात आहे का?” अशा चर्चा आता परिसरात जोर धरू लागल्या आहेत. काही पालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असेल तर प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.
शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि गुणवत्ता राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना, अशा गंभीर तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



No comments