अखेर दृश्यम सदृश्य थरार उघड; बारा वर्षांपूर्वीच्या अपहरण खून प्रकरणाचा थरारक उलगडा!
गौरव शेलार / मुरबाड : बुधवारी दुपारी मुरबाड शहरातील ग्रामीण रुग्णालय भागात दृशम चित्रपट सारखी घटना निदर्शनास आली आहे.मुरबाड शहरातील शासकीय रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या शवविच्छेदन गृहाच्या भिंतीलगत बुधवारी दुपारपासून मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात होता. उत्खननातून सांगाडा काढल्याची चर्चा असून मुरबाडमध्ये 'दृश्यम' चित्रपटासारखाच काही थरार नाही ना, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. मात्र मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर रील स्टार म्हणून वावरणाऱ्या सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा धक्कादायक आणि काळीज हादरवणारा कारनामा समोर आला आहे. तब्बल १२ वर्षांपूर्वी दावडीतील तरुण करण बागुल यांच्या अपहरण आणि खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखेने थरारक उलगडा करत मुख्य आरोपी सुरेंद्र पाटीलसह चंद्रकांत गायकर आणि सुरेश देगावत उर्फ छोटू या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
सात एकर जमिनीच्या व्यवहारातील पैशांच्या वादातून ४ ऑक्टोबर २०१४ रोजी करण बागुल याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर दावडी येथील कार्यालयात नेऊन सुरेंद्र पाटील याने लोखंडी रॉडने करणच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह कारमध्ये टाकून मुरबाड येथील बारवी धरणाजवळील जंगलात नेला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्या काळात मुरबाड पोलिसांना सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची नोंद आणि नव्या तपासातील धागेदोरे जुळवत गुन्हे शाखेने अखेर या थरारक गुन्ह्याचा पर्दाफाश केला.गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक-०३च्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कसून चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.या प्रकरणात आता अपहरणासोबतच खून आणि पुरावा नष्ट करण्याची गंभीर कलमे जोडण्यात आली असून न्यायालयाने तिन्ही आरोपींना २ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खूनासाठी वापरण्यात आलेला लोखंडी रॉडही पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहेत.



No comments