Rupali Chakankar: भोंदू खरातशी मैत्री पडली महागात; मुख्यमंत्र्यांची रुपाली चाकणकरांवर केली मोठी कारवाई
भोंदू बाबा अशोक खरातशी जवळीक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना महाग पडलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. NDTV मराठीला सूत्रांनी ही खळबळजनक माहिती दिली आहे.
भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याचे एकामागून एक नवे प्रताप उघड होत आहेत. या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर आणि खरात यांच्यातील जवळीक दर्शवणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या पुराव्यांमुळे चाकणकर यांना आता आपला बचाव करणे कठीण झाले असून, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
सुषमा अंधारे यांचा खळबळजनक आरोप
रुपाली चाकणकर या अशोक खरात चालवत असलेल्या संस्थेमध्ये सदस्य असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. मात्र, या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत गंभीर दावा केला आहे. रुपाली चाकणकर या केवळ खरातच्या संपर्कात नव्हत्या, तर त्या स्वतः देखील तंत्रमंत्र करत होत्या, असा थेट आरोप अंधारे यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांचा कठोर निर्णय
महिलांचे शोषण करणाऱ्या एका भोंदू बाबासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची जवळीक असल्याचे ठोस पुरावे समोर आल्यानंतर सरकारची अडचण वाढली आहे. ही बाब गांभीर्याने घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात पुढील काय कारवाई होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



No comments