शास्ती माफी योजनेला अजून तीन महिन्याची मुदतवाढ द्या - आमदार किसन कथोरे
बदलापूर : सध्या सुरू असलेले अमेरिका इराण युद्ध व कर दात्यांच्या आर्थिक नियोजनामध्ये आलेली तूट व कुळगांव बदलापूर नगरपालिकेच्या मालमत्ता कराची चांगल्या प्रकारे वसुली होण्याकरता मालमत्ता करावरील शास्ती माफी योजनेस अजून तीन महिन्यांची मुदत वाढ म्हणजेच ३० जूनपर्यंत मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी राज्याच्या नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना केली आहे.
यासंदर्भात आ. किसन कथोरे यांनी यापूर्वी २१ जानेवारी रोजी दिलेल्या पत्राची दखल घेतल्यामुळे शास्ती माफीचा निर्णय घेण्यात आला होता. सदर योजना यापूर्वी १९ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी जाहिरात कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या प्रशासनामार्फत करण्यात आली होती. त्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
नागरिकांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिल्यास जास्तीत जास्त नागरिक कर भरण्यास अनुकूल असून कुळगांव बदलापूर नगरपालिकेला तसा प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे नगर विकास विभागाने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे.



No comments