web-banner-lshep2024

Breaking News

मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामावेळी पुलाचा भाग रिक्षावर कोसळला, तीन जण जखमी, एकाचा मृत्यू

मुंबई : मुलुंडच्या पश्चिम भागात मुंबई मेट्रोचं बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मोठा अपघात झाला आहे. मुंबई मेट्रोच्या पुलाचा काही भाग उंचावरुन खाली कोसळला. या घटनेत 3 जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

एका व्यक्तीचा मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (14 फेब्रुवारी) रोजी दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मुलुंड पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री रोडवर जॉनसन अँड जॉनसन कंपनीच्याजवळ मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरु असताना पुलाचा काही भाग रिक्षा आणि कारवर कोसळला. यावेळी रिक्षातून प्रवास करणारे 3 जण जखमी झाले. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, अग्निशमन दल, पोलीस, मेट्रो कर्मचारी, वॉर्ड कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तसंच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याचं पाहायला मिळालं.

निष्काळजीपणाला कोण जबाबदार? : दरम्यान, या घटनेबाबत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, "ही घटना दुर्दैवी आहे. हा पूर्णपणे निष्काळजीपणा आहे. त्यामुळं प्रश्न असा आहे की, या निष्काळजीपणाला कोण जबाबदार आहे, कंत्राटदार की इतर कोणी? कंत्राटदारानं बॅरिकेड्स लावताना सर्व खबरदारी घेतली आहे का? ते आपल्याला पाहावं लागेल. तसंच वाहनांना खाली का जाऊ दिलं गेलं? आपल्याला चौकशी करावी लागेल," असं महापौर रितू तावडे यांनी सांगितलं. तसंच जखमींना येथील उपासना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात असून आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आल्याचंही महापौर रितू तावडे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश : दुसरीकडे, या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री? : "मुलुंडमध्ये झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी काम सुरू असताना अचानकपणे स्लॅब कोसळला. त्यामध्ये एकाचा मृत्यूही झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांसोबत आमच्या प्रार्थना आहेत. जे जखमी आहेत. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. सर्व काळजी एमएमआरडीए व राज्य सरकारकडून घेतली जातेय. हा अपघात तिथे झाला आहे, त्यात आवश्यक काळजी घेतली गेली की नाही, याची सुद्धा चौकशी केली जाईल. मात्र, काळजी घेतली असती, तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. त्यामुळं या घटनेसाठी जे जबाबदार आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. अशा पद्धतीनं जिथं जिथं काम सुरू आहे, त्या ठिकाणी सेफ्टी ऑडिट करून तिथं अशी घटना घडणार नाही, याचे प्रयत्न केले जातील. तसंच मृतकाच्या कुटुंबाला शासनाकडून मदत केली जाईल," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

No comments