web-banner-lshep2024

Breaking News

Mumbai : सिद्धिविनायक मंदिरात नारळ, फुल, प्रसादावर बंदी

मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव ११ मेपासून देवतांना अर्पणासाठी नारळ, फुलमाळा आणि प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचे सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी सांगितले.प्रभादेवी परिसरात वसलेले हे मंदिर जगप्रसिद्ध असून दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर म्हणाले की, हे मंदिर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे. सरकार आणि पोलिसांकडून अनेक सुरक्षा सल्ले आम्हाला मिळतात. अलीकडेच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ट्रस्टसोबत बैठक घेतली होती.त्यांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव धोका निर्माण होऊ शकतो. प्रसादामध्ये विष मिसळले जाऊ शकते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरूपात नारळ, फुलमाळा आणि प्रसाद देवतांना अर्पण करण्यास बंदी घालण्यात येत आहे, असे सरवणकर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, भारत-पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता ही तात्पुरती खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.सरवणकर यांनी सांगितले की, मंदिराबाहेरील फुलविक्रेत्यांशी चर्चा केली असून त्यांनी आपला प्रसादाचा विद्यमान साठा संपवण्यासाठी ११ मेपासून ही अंमलबजावणी सुरू करण्याची विनंती केली होती, ती मान्य करण्यात आली.या निर्णयासोबतच मंदिर ट्रस्ट श्री गणेशाचे आवडते दुर्वा आणि फुले भाविकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.

सुरक्षा वाढवण्यासाठी मंदिर ट्रस्ट २० माजी सशस्त्र दलातील जवानांची भरती करणार आहेत.ते सशस्त्र असतील, असेही सरवणकर यांनी सांगितले. भाविकांची सुरक्षा ही पोलीस आणि मंदिर ट्रस्टची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

No comments