web-banner-lshep2024

Breaking News

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..!36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव

 

मुरबाड  : मुरबाड तहसील कार्यालयात 36 वर्षांहून अधिक काळ शिपाई म्हणून अविरत सेवा करणारे तातू ठाकरे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेचा अनोख्या पद्धतीने गौरव करण्यात आला. दि.30 एप्रिल या निवृत्तीच्या दिवशी, तातू ठाकरे यांना खुद्द तहसिलदार अभिजित देशमुख यांनी आपल्या खुर्चीत बसवून त्यांच्या कार्याचा सन्मान केला.

1989 मध्ये शिपाई म्हणून रुजू झालेले तातू ठाकरे आपल्या कामाप्रती नेहमीच निष्ठावान राहिले. कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याशी त्यांचे आपुलकीचे संबंध होते. त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तहसिलदार अभिजित देशमुख म्हणाले की, “तातू ठाकरे यांनी 36 वर्षांहून अधिक काळ कार्यालयात अत्यंत निष्ठेने काम केले. त्यांनी कधीही वेळेची किंवा कामाची तक्रार केली नाही. शिपाई म्हणून काम करत असतानाही त्यांनी नेहमीच आपले कर्तव्य चोखपणे बजावले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि मदतनीस असल्याने ते सर्वांचेच लाडके होते.ते पुढे म्हणाले, “आज त्यांच्या निवृत्तीचा दिवस आहे आणि त्यांच्या या प्रदीर्घ सेवेचा सन्मान म्हणून मी त्यांना माझ्या खुर्चीत बसविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कार्यालयासाठी जे काही केले आहे.

    त्याची परतफेड पैशांमध्ये होऊ शकत नाही, पण हा एक छोटासा प्रयत्न आहे त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा.या अनोख्या सन्मानामुळे तातू ठाकरे भावुक झाले होते. त्यांनी तहसिलदार देशमुख आणि कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. तातू ठाकरे यांच्या या गौरवशाली निरोपाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये एक सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची ही कहाणी निश्चितच इतरांनाही प्रेरणा देईल.

No comments