web-banner-lshep2024

Breaking News

वास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा


सिंधुदुर्ग/पंकज मोरे : एकट्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आज पाच लाखांहून अधिक विद्यार्थी एमपीएससीद्वारे (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे) घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. वय आणि संधी संपली म्हणून दरवर्षी लाखो विद्यार्थी बाहेर पडतात आणि लाखो नवीन विद्यार्थी अभ्यासाची सुरुवात करतात. एमपीएससीशिवाय पोलीसभरती, सैन्यभरती, लिपिक परीक्षा, बॅंकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन व इतर टेक्निकल पदांसाठीच्या परीक्षा ते यू.पी.एस.सी. (केंद्रीय लोकसेवा आयोग) चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठी आहे. या स्पर्धा परीक्षांनी मोठ्या प्रमाणावर अर्थकारण आणि राजकारणही व्यापलेले आहे.

     आपले प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय आहे की नाही, आपल्यामध्ये अधिकारी होण्यासाठीच्या क्षमता आहेत का, अधिकारी होऊन आपल्याला नेमके काय करायचे आहे या प्रश्नांवर गांभीर्याने विचार न करता विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षांकडे का वळतात याचे उत्तर पहिल्यांदा शोधायला हवे. हाती आलेले स्मार्टफोन्स, इंटरनेटचा वाढता वापर, वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, अधिकाऱ्यांचे सत्कार-समारंभ, पास झाल्यावर गावोगावी निघणाऱ्या मिरवणुका, शाळा महाविद्यालयांतील चर्चा यांमुळे आता सर्वसाधारणपणे दहावी बारावीचा अभ्यास करत असताना किंवा पदवीकाळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख होते.

     आजूबाजूच्या चर्चा ऐकणारे पालकदेखील या परीक्षांविषयी माहिती मिळवायला लागतात. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांची भाषणे, अनुभव यूट्यूबद्वारे  ऐकत-पाहत असतात. ‘मी कसा अभ्यास केला’, ‘यशाची रणनीती काय’ अशा विषयांवरची यशस्वी अधिकाऱ्यांची मनोगते विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनावर प्रभाव टाकतात. ‘मन में है विश्वास’, ‘कार्यकर्ता अधिकारी’, ‘अभ्यास ते अधिकारी’ हे शब्द विद्यार्थ्यांच्या मनात घर करतात. सनदी अधिकाऱ्यांची अनुभवपर, प्रोत्साहन देणारी पुस्तके विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर वाचतात. शिवाय डाॅक्युमेंटरीज, वेबसिरीज, आजूबाजूच्या चर्चा, यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्काराचे कार्यक्रम या सर्वांमुळेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राविषयी आकर्षण निर्माण होते. त्यांनी रुबाबदार अधिकारी प्रत्यक्षात पाहिलेले असतात; त्यांची भाषणे ऐकलेली असतात; त्यांच्याबद्दल वाचलेलं असतं; ही परीक्षा पास झाल्यावर आपल्यालाही अशीच प्रतिष्ठा लाभेल; आपण आपल्या गरिबीचं निर्मूलन करू शकू; खासगीपेक्षा सरकारी नोकरी जास्त चांगली; पद, प्रतिष्ठा, पैसा या सर्वच गोष्टी मिळतील या आकर्षणामुळे लाखोंच्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळतात.

     काही विद्यार्थी मात्र याला अपवाद आहेत. ते केवळ आकर्षणापोटी नव्हे तर मनाशी ध्येय बाळगून आणि त्यांच्यामध्ये क्षमता असते म्हणून विचाराअंती स्पर्धा परीक्षेकडे आलेले असतात. मात्र हा अपवाद वगळता इतरांना ‘तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास का करता?’ हा प्रश्न विचारल्यावर त्यांच्याकडून काही ठरावीक पठडीतली उत्तरे मिळतात. ‘सरकारी नोकरीत आर्थिक सुरक्षितता आहे’, ‘मानसन्मान मिळतो’, ‘हाती अधिकार येतात’, ‘हाती अधिकार आल्यामुळे देशसेवा करायला मिळते’, ‘चांगलं काम करता येतं’ असे त्या उत्तरांचे स्वरूप असते. एकूणच काय... तर आकर्षण ही अशी गोष्ट आहे जी लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना इकडे खेचून आणते. गर्दी झाल्यामुळे मार्केट वाढले. खासगी क्लासेस मोठ्या प्रमाणावर सुरू झाले, संदर्भसाहित्य सहज उपलब्ध व्हायला लागले. शहरांतून स्पर्धा परीक्षांची सेंटर्स निर्माण झाली. साहजिकच स्पर्धा वाढली. परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या आणि पद मिळणाऱ्यांची संख्या यांत प्रचंड दरी निर्माण झाली. या तुलनेत भरती करणाऱ्या संस्था तेवढ्या प्रमाणात सक्षम झाल्या नाहीत. खासगी क्षेत्रांना सरकारी धोरणाने दिलेले झुकते माप, सरकारी सेवेतील पदांची कमी होणारी संख्या, लोकसेवा आयोगाच्या कामातील विसकळीतपणा, मेगा भरतीमधील फोलपणा, आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न, कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती, त्यामुळे ठप्प झालेली भरतीप्रक्रिया, भरती प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप, भविष्याविषयी दिसू लागलेली अस्पष्टता यांमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निराशा आणि अस्वस्थता आहे.

     सातत्य आणि संयमाची परीक्षा कोणालाही चुकलेली नाही पण शासकीय नोकरीच्या पलीकडेही एक जग असते. आपल्या मागे आपले घर असते. प्रत्येकाचा संघर्ष तितकाच महत्त्वाचा असतो पण तो आपल्या जवळच्या लोकांपेक्षा महत्त्वाचा खरेच नाही. निराशेच्या एका क्षणी त्यांचा विचार केला पाहिजे. आपल्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षांच्या लांब, थकवणाऱ्या प्रक्रियेत संधीची वाट पाहत असणारी अनेक तरुण मंडळी दिसतील.


No comments