राजकारणात पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र वाचवला पाहिजे - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील अविनाश जाधव आणि इतर उमेदवारांसाठी आज सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकास आणि महायुतीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. यंदाची विधानसभा निवडणूक ही राज्याच्या भवितव्याची निवडणूक आहे.
ज्या लोकांना तुम्ही आधी निवडून दिलं ते पुन्हा निवडून आले तर या महाराष्ट्राला कुणीही वाचवू शकणार नाही. आता जो चिखल झाला आहे, त्यात जे उभे आहेत त्यांना निवडून दिले तर त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढेल. आम्ही जे केलं ते योग्य केलं असा त्यांचा समज होईल. त्यानंतर पुढे काही खरं नाही. असंच राजकारण सुरु राहील. मी तुमच्यासमोर हात पसरतोय, सगळ्यांकडून वाटोळं झालेलं पाहिलं ना, आता एकदा मला संधी देऊन बघा, असं आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केलं.
राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात मागील पाच वर्षांपासून फोडाफोडीचंच राजकारण सुरु आहे. तु्म्ही दिलेले मत आता कुठे फिरतंय हे तपासून पाहा. शिवसेना-भाजप म्हणून आणि काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणून तुम्ही मतदान केलं, आता ते कुठे आहे. तुम्हाला गृहीत धरलं जातं म्हणून असं होतं. इतक्या वर्षांचा समज तुम्ही मोडत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राला चांगले दिवस येणारच नाहीत.
राजू पाटील माझा एकमेव आमदार होता. सहज सौदा करता आला असता.
मात्र मला अभिमान आहे, माझ्याकडचा आमदार विकणारा नाही तर टिकणारा आहे.
फोडाफोडीचं राजकारण राज्यात शरद पवारांनी सुरु केलं. 1988 साली ते पक्ष
फोडून मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिवसेना फोडली. मात्र गेल्या पाच वर्षात
याचा कळस गाठला. आता पक्ष आणि चिन्ह देखील चोरून नेले, असंही राज ठाकरे
म्हणाले.
शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी
नाही. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. ते गेल्यावर त्याचा सौदा करता
तुम्ही. माझे कितीही मतभेद असले तरी सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि
घड्याळ शरद पवारांचीच प्रॉपर्टी आहे. हे कुठे चाललंय राजकारण. निर्लज्यपणे
हे सगळं सुरु आहे. कारण तुम्हाला राग येत नाही, तुम्ही बदला घेत नाहीत.
राजकारण्यांना तुम्ही कधीही प्रश्न विचारत नाही. राजकारणात पक्ष मेले तरी
चालतील पण महाराष्ट्र वाचवला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
No comments