उत्तर प्रदेशात अग्निकांड! १० नवजात बालकांचा होरपळून अंत; त्रिस्तरीय चौकशीचे राज्य सरकारचे आदेश
लखनऊ/झाशी : उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या लहान मुलांच्या कक्षाला शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. राज्य सरकारने अर्भकांच्या पालकांना पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले असून या घटनेच्या त्रिस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून अर्भकांच्या पालकांना दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचे जाहीर केले आहे.
महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयातील एनआयसीयू विभागामध्ये शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असे झाशीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले. एनआयसीयूच्या बाहेर जी अर्भके होती त्यांना वाचविण्यात आले, त्याचप्रमाणे आतील भागातील काही अर्भकांनाही वाचविण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.
ही दुर्घटना घडली तेव्हा एनआयसीयूमध्ये ५२ ते ५४ नवजात अर्भके होती. त्यापैकी १० जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य १६ जणांवर उपचार केले जात आहेत. एनआयसीयूमध्ये आग लागल्यानंतर काही पालक आपल्या अर्भकांना घेऊन रुग्णालयातून निघून गेल्याचेही सांगण्यात येत आहे.
अहवाल सादर करण्याचे आदेश
झाशीचे विभागीय आयुक्त आणि पोलीस उपमहानिरीक्षकांना या दुर्घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अन्य १६ अर्भकांवर विविध विभागांमध्ये उपचार करण्यात येत आहेत, जी अर्भके केवळ तीन- चार दिवसांची आहेत. त्यांना उबदार कक्षात ठेवण्यात आले आहे.
No comments