शरचंद्रपवार फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, व्हेनच्युअर केंद्रात कार्यशाळेसाठी उपस्थिती
ओतूर : श्री.गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,पुणे नियंत्रित व्हेनच्युअर केंद्र , पुणे या ठिकाणी व्यवसाय - उद्योग सुरुवात व प्रयोगशाळा सुविधा प्रात्यक्षिक या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत अंतिम वर्ष पदवी औषधनिर्माणशास्त्र शाखेचे ३५ हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .गणेश दामा यांनी दिली.
सदर कार्यशाळेचे आयोजन सी. एस.आर भागीदार कार्पोरेट सामाजिक जबाबदारी या पार्श्वभूमीवर व्ही.सी ऍनालिटी क्स, टेन एक्स इन,व्हेनच्युअर सेंटर, एक्सपांडेड पोलिमर सिस्टीम यांच्या सहयोगातून केले होते. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही देश पातळीवरील रसायन शास्त्रातील नाविन्यपूर्ण यंत्रसामग्रीने सुसज्ज असणारी प्रयोगशाळा असून विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा यंत्रसामग्री प्रात्यक्षिके खूपच फायदेशीर ठरले आहे असे मत विद्यार्थी प्रतिनिधींनी मांडले.
कार्यशाळेमध्ये व्यावसायिक व उद्योग जगतातले तज्ञ प्रवक्त्यांनी देखील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. यामध्ये मुग्धा लेने मुख्य प्रवक्त्या यांनी नट आणि बोल्ट निर्मिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित व्यवसाय व उद्योग, उत्पादन गुणवत्ता आणि त्याची हमी या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तदनंतर दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. अस्मिता प्रभारे यांनी देखील अन्न व कृषी व्यवसाय, जैवतंत्रज्ञान या विषयांवर उद्योग निर्मिती व व्यवसाय निर्मिती यावर मार्गदर्शन केले. तसेच अखेरच्या सत्रामध्ये डॉक्टर रुपेश पवार यांनी मोहाच्या झाडापासून तेल निर्मिती या स्वप्रयोग उद्योगावर भाष्य केले. उद्योग व्यवसाय मार्गदर्शन सत्र समाप्तीनंतर प्रयोगशाळेतील साधने संसाधने तसेच यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. त्यामध्ये एच.पी.एल.सी, जी. सी,एल.सी असे अनेक नाविन्यपूर्ण यंत्रांची माहिती देण्यात आली. कार्यशाळेची समाप्ती विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन करण्यात आली.
विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्र अभ्यास पाठ्यक्रमासोबत अशा शैक्षणिक भेटीतून नाविन्यपूर्ण गोष्टी व प्रात्यक्षिके शिकायला मिळतात. संशोधन विकासातील चालू घडामोडींची माहिती मिळते त्यासाठी महाविद्यालय अशा प्रकारच्या शैक्षणिक भेटी व कार्यशाळेमध्ये सक्रिय सहभागी होत राहील असे प्रतिपादन डॉ. गणेश दामा यांनी केले. सदर शैक्षणिक भेट यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी डॉ.सुमित जोशी व प्रो.चेतन पुलाटे आदी प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले.
No comments