कसारा पोलीस ठाणे येथील खुनाचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश 3आरोपी गजाआड
ठाणे : कसारा पोलीस ठाणे येथील खुनाचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.दिनांक ३०/०७/२०२४ रोजी एक अनोळखी पुरुष यास कोणीतरी अज्ञात आरोपी यांनी जिवे ठार मारुन त्याचे प्रेत नाशिक-मुंबई वाहिनीवर असलेल्या कामडीपाडा गावचे हदीत वाशाळा पुलाच्या जवळील एका छोटया पुलाच्या बाजुला पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने नग्न अवस्थेत टाकुन दिला होता. गुन्हा कसारा पोलीस ठाणे येथे गु. रजि. क्र ११५ / २०२४ १०३(१), २३८ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयांचे गांभिर्य लक्षात घेवुन डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण तसेच श्रीमती डॉ. दिपाली धाटे, अपर पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली मिलींद शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहापुर, सुरेश मनोरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व सुनिल बच्छाव, पोलीस निरीक्षक, कसारा पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली कसारा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांचे वेग-वेगळे पथक तयार करण्यात आले होते.
सदर गुन्हयांचे तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक, महेश कदम यांना मिळालेल्या माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर मयताचे नाव विजय बिभिषण जाधव वय ३५ असे असुन तो घाटकोपर, मुंबई येथे राहावयास असल्याचे समजले. सदर गुन्हयांचा अधिक तपास केला असता मनोज चंद्रसेन पवार वय ३३ वर्षे रा. आस्लफा, घाटकोपर, मुंबई यांस गुन्हयांत संशयीत म्हणुन ताब्यात घेण्यात आले त्यांचेकडे कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, “ मयत राहत असलेला रुम मला पाहिजे होता परंतु मयत हा रुम देत नसल्याचे कारणावरुन ” राग आल्याने मी व माझे साथिदार नुरमोहम्मद गुलाम हुसेन चौधरी वय १९ रा. घाटकोपर, मुंबई, हतिक संजय पांडे वय २२ वर्षे रा. एअरपोर्ट रोड, अंधेरी ईस्ट, मुंबई मुळ रा. सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश यांचे मदतीने मयताचा दोरीने गळा आवळुन त्यास ठार मारले असल्याची कबुली दिली असून तिन्ही आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयांचा अधिक तपास सुनिल बच्छाव, प्रभारी अधिकारी, कसारा पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, डॉ. डी. एस. स्वामी तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती डॉ. दिपाली धाटे यांचे मार्गदर्शनाखाली मिलींद शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शहापुर व सुरेश मनोरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सुनिल बच्छाव, पोलीस निरीक्षक, कसारा पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली पो.उप.निरीक्षक महेश कदम, पोहवा/प्रविण हाबळे, प्रकाश साईल, संतोष सुर्वे, सुनिल कदम, सतीष कोळी, हेमंत विभुते, गोविंद कोळी, विजय भोईर, पो. शि/ स्वप्नील बोडके पथकाने उल्लेखनिय कामगिरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
No comments