कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये मृत चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाखांची मदत
BY
- युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापूर |
अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील मयत झालेल्या चौघाजणांच्या नातेवाईकांना
प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत आज करण्यात आली. त्याचबरोबर आजअखेर जिल्ह्यातील
4417 पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार
अशी 2 कोटी 20 लाख 85 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी दिली.
अतिवृष्टीमध्ये चंदगड तालुक्यातील
हलकर्णी गावचे जिजाबाई सतुप्पा कडुकट (वय 55) यांचा तसेच आजरा तालुक्यातील इटे गावचे
केशव बाळू पाटील (वय 55) यांचा 6 ऑगस्ट रोजी, गडहिंग्लज तालुक्यातील कडलगे गावचे चिंतामणी
मारुती कांबळे (वय 45) यांचा 12 ऑगस्ट रोजी आणि पन्हाळा तालुक्यातील पिंपळे तर्फ सातवे
येथील तानाजी पाडुरंग पोवार (वय 35) यांचा 9 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. यांच्या
नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयाची मदत आज देण्यात आली. पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात 10 हजार
आणि शहरी भागात 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी 5 हजार
रुपयांचा रोख वाटप कालपासून करण्यात आले. यात ग्रामीण भागातील 4130 आणि शहरी भागातील
287 अशा एकूण 4417 कुटुंबांना 2 कोटी 20 लाख 85 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे.



No comments