web-banner-lshep2024

Breaking News

लोकांचे पैसे घेऊन मनोज उर्फ ‘पप्या’ म्हात्रे फरार? तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत; मुरबाड पोलिसांकडून शोध सुरू

 

मुरबाड : सिलिंगचे काम करून देण्याचे आश्वासन देत नागरिकांकडून पैसे घेणे आणि काम अपूर्ण ठेवून फसवणूक केल्याचा आरोप असलेला मनोज उर्फ ‘पप्या’ म्हात्रे हा सध्या फरार असल्याची चर्चा मुरबाड परिसरात सुरू आहे. या प्रकरणामुळे पैसे देऊनही काम पूर्ण न झालेल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवगाव येथील बोटकुंडले चाळीत राहणारा मनोज उर्फ ‘पप्या’ म्हात्रे हा सिलिंगचे काम करून देण्याचे सांगून नागरिकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. मात्र, पैसे घेऊनही काम पूर्ण न केल्याने संबंधित नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यापूर्वीही त्याने अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे.

दरम्यान, मनोज उर्फ ‘पप्या’ म्हात्रे हा वाडा तालुक्यात लपून बसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असल्याची चर्चा आहे. मुरबाड पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असल्याचे समजते. विशेष म्हणजे, मनोज उर्फ ‘पप्या’ म्हात्रे हा एका नामांकित ठेकेदाराचा जावई असल्याचीही चर्चा परिसरात आहे.त्यामुळे या प्रकरणात कोणाचे राजकीय किंवा आर्थिक पाठबळ आहे का, असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पैसे गेले, काम झाले नाही आणि आता संबंधित व्यक्तीच संपर्काबाहेर असल्याने तक्रारदारांनी न्याय कोणाकडे मागायचा? असा सवाल उपस्थित होत आहे. मुरबाड पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा, तक्रारदारांचे जबाब नोंदवावेत आणि दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.आता मुरबाड पोलिसांच्या तपासातून या प्रकरणाचे सत्य कधी समोर येणार आणि फसवणुकीचा आरोप असलेल्या नागरिकांना त्यांचे पैसे परत कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

No comments