web-banner-lshep2024

Breaking News

जिल्हाधिकारी साहेब, महोत्सवाबरोबर दुष्काळ, पाणीटंचाई अन् उत्खननाचीही पाहणी करा!

 

नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड तालुक्यातील वैशाखरे परिसरात भव्य भोंडाई महोत्सव सुरू असून, या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड उपस्थित आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर, “साहेब, महोत्सवासाठी आला आहात तर परिसरातील रेती-माती उत्खनन झालेल्या ठिकाणांची आणि करपलेल्या शेतीचीही एक फेरी मारून पाहणी करा,” अशी आर्त मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मुरबाड तालुक्यातील डोईफोडे नदीपात्रासह न्याहाडी, वाल्हिवरे, मेर्दी, थिदबी, सावर्णे आणि उमरोली खुर्द परिसरात मोठ्या प्रमाणावर रेती-माती उत्खनन झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून उत्खननाची व्याप्ती निश्चित करावी, संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, अशीही नागरिकांची अपेक्षा आहे.

एका बाजूला महोत्सवाचा जल्लोष, दुसरीकडे आदिवासी भागात पाणीटंचाई!

भोंडाई महोत्सवाच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण असले, तरी याच डोंगराळ भागातील अनेक गावांना पाणीटंचाई, रोजगाराचा अभाव आणि शेतीच्या नुकसानीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रोजगाराच्या संधी कमी असल्याने आदिवासी बांधवांना ओतूर, आळेफाटा, नारायणगाव आणि नगर परिसरात मजुरीसाठी स्थलांतर करावे लागत आहे.

माळरानावरील पिके करपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे उत्पन्न घटल्यामुळे ग्रामीण कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे केवळ उत्सवाच्या ठिकाणी उपस्थिती नोंदवण्यापुरते मर्यादित न राहता, जिल्हाधिकाऱ्यांनी या भागातील प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करा!

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित गावांतील करपलेल्या शेतीची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला निर्देश द्यावेत. मुरबाड तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेऊन बाधित शेतकरी आणि नागरिकांना शासनाच्या निकषांनुसार मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव व अहवाल पाठवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जिल्हाधिकारी साहेब, भोंडाई महोत्सवातील आदिवासी बांधवांचा नाच-गाण्याचा आनंद नक्कीच महत्त्वाचा आहे; पण त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रोजगाराची चिंता, करपलेली शेती आणि कथित अवैध उत्खननाचे वास्तवही तितकेच महत्त्वाचे आहे. या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रत्यक्ष पाहणी व नियमानुसार कारवाई केली, तरच महोत्सवाच्या आनंदाला विकासाची आणि लोककल्याणाची खरी जोड मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

No comments