YML NEWS IMPACT ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांच्या मागणीला यश; जिल्हाधिकारी थेट शेताच्या बांधावर!;पाणीटंचाई नियोजन आणि अवैध उत्खननावर कारवाईचे निर्देश
मुरबाड : मुरबाड
तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि बेसुमार रेती, माती व दगड उत्खननाच्या
प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार तथा स्वतंत्र संपादक
पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केलेल्या मागणीला अखेर यश
आले आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मुरबाड तालुक्यातील
शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी केली असून, पीक नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले आहेत. त्यामुळे ‘YML NEWS’ आणि ‘दैनिक जनदिशा’च्या पाठपुराव्याचा प्रशासनावर प्रभाव
पडल्याची चर्चा मुरबाडमध्ये सुरू आहे.
सात मिनिटांत जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिसाद!
मुरबाड
तालुक्यातील वैशाखरे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित भोंडाई महोत्सवाच्या
कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आले असताना ज्येष्ठ पत्रकार
नामदेव शेलार यांनी त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. केवळ
कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापुरते मर्यादित न राहता जिल्हाधिकाऱ्यांनी
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी आग्रही विनंती त्यांनी केली होती.
मुरबाड, भिवंडी तसेच इतर तालुक्यांतील दुष्काळी
परिस्थिती, संभाव्य पाणीटंचाई आणि विनापरवानगी रेती, माती व दगड उत्खननाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी लेखी निवेदनही दिले
होते. या मागण्यांबाबत ‘वायएमएल न्यूज’ आणि ‘दैनिक जनदिशा’मध्ये वृत्त प्रसिद्ध
करण्यात आले होते.
या
वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अवघ्या सात मिनिटांत
संपादक गौरव शेलार यांना व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून तहसीलदारांसोबत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पीक पाहणी करणार असल्याचे कळवले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि
पंचनाम्याची कार्यवाही करण्यात आली.
पाणीटंचाईच्या नियोजनाचे आदेश; अवैध उत्खननावरही लक्ष!
शेतकऱ्यांच्या
पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईचे योग्य
नियोजन करण्यासाठी तहसीलदारांना निर्देश दिल्याची माहिती आहे. तसेच रेती, माती आणि दगडांचे विनापरवानगी उत्खनन
करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीचीही दखल घेण्यात आली आहे.
मुरबाड
तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि
सर्वसामान्य नागरिकांसाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मात्र, पीक नुकसानीच्या पंचनाम्यांनंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार,
पाणीटंचाई रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आणि अवैध
उत्खननाविरोधात नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे आता
नागरिकांचे लक्ष लागले आहे.
३५ वर्षांची निर्भीड पत्रकारिता; जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा
ज्येष्ठ
पत्रकार नामदेव शेलार हे गेल्या ३५ वर्षांपासून ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि
देशातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर शासनदरबारी आवाज उठवत आहेत. शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधव
आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून
देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या
पत्रकारितेतील ठाम भूमिका, जनसंपर्क आणि
प्रश्नांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे अनेक सामान्य नागरिकांना आपल्या समस्या
मांडण्यासाठी व्यासपीठ मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. राजकीय
नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संबंधित
घडामोडींवर लक्ष ठेवतानाच सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये मानली जातात.अनेक जण प्रश्न उपस्थित
करतात; मात्र ते प्रश्न मार्गी लागेपर्यंत सातत्याने
पाठपुरावा करणे महत्त्वाचे असते. मुरबाडमधील दुष्काळी परिस्थिती आणि पीक पाहणीचा
मुद्दा त्याचे उदाहरण ठरत असल्याची चर्चा आहे.
मुरबाडमध्ये जनहिताच्या पत्रकारितेला बळ!
जिल्हाधिकाऱ्यांनी
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केल्यामुळे शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला
दिलासा मिळाला आहे. नामदेव शेलार यांच्या मागणीला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल
शेतकरी, कष्टकरी आणि आदिवासी
बांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पत्रकारिता
ही केवळ बातमी प्रसिद्ध करण्यापुरती नसून, जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही घडवून आणण्याचे
प्रभावी माध्यम आहे, हे मुरबाडमधील या घडामोडीने पुन्हा
अधोरेखित केले आहे.आता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी
होऊन शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी, पाणीटंचाईवर वेळीच
उपाययोजना व्हाव्यात आणि अवैध उत्खननाला आळा बसावा, अशी
अपेक्षा मुरबाडकरांकडून व्यक्त होत आहे.

.jpeg)


No comments