web-banner-lshep2024

Breaking News

माजी नगराध्यक्षांनी पत्रकारांना शहाणपण शिकवू नये; कारण पत्रकारितेची ताकद काय असते, हे वेळ आल्यावर कळते!

गाडी, पैसा आणि पद मिळाले म्हणून माणूस मोठा होत नाही; तर आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला की माणूस मोठा होतो. आणि ज्यांच्या प्रगतीच्या प्रवासात पत्रकारितेचा वाटा आहे, त्यांनीच पत्रकारांना कमी लेखावे, यापेक्षा मोठी विसंगती कोणती?

मुरबाडच्या माजी नगराध्यक्षांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी—पत्रकारिता ही कोणाच्या दयेवर चालणारी व्यवस्था नाही आणि पत्रकार हा कोणाच्या इशाऱ्यावर चालणारा माणूस नाही. पत्रकाराला दुसऱ्या ठिकाणी जाऊन कंपनीत काम करा, दुसरा व्यवसाय करा, असा सल्ला देण्यापूर्वी आपण स्वतः कोण आहोत, कुठून पुढे आलो आणि आपल्या सार्वजनिक जीवनात पत्रकारितेची भूमिका काय राहिली आहे, याचे आत्मपरीक्षण करणे अधिक गरजेचे आहे.

आज तुमच्या दारात गाडी उभी असेल, तुमच्याकडे पैसा असेल, लोक तुमच्या भोवती फिरत असतील; पण म्हणून तुम्ही सर्वज्ञानी झालात, असा त्याचा अर्थ होत नाही. आर्थिक प्रगतीचा अभिमान असणे वेगळे आणि त्या अभिमानातून इतरांना तुच्छ समजणे वेगळे! स्वतःची परिस्थिती सुधारली म्हणून पत्रकाराला त्याच्या व्यवसायाचे धडे 'देण्याचा अधिकार आपल्याला मिळत नाही.

माजी नगराध्यक्ष महोदय, पत्रकारितेला कमी लेखण्यापूर्वी एकदा विचार करा—तुमच्या सार्वजनिक जीवनातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम कोणी केले? तुमच्या कामाची दखल समाजापर्यंत नेण्याचे माध्यम कोणते होते? आणि जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या पत्रकारितेचे महत्त्व तुम्ही विसरलात तरी समाज ते विसरणार नाही.

पत्रकारिता ही केवळ बातम्या छापण्याची प्रक्रिया नाही. ती जनतेच्या प्रश्नांचा आवाज आहे, सत्तेला प्रश्न विचारणारी व्यवस्था आहे आणि लोकप्रतिनिधींच्या कामकाजाचे परीक्षण करणारा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. आज तुम्ही माजी नगराध्यक्ष असाल; उद्या दुसरे कोणी त्या पदावर असेल. पदे बदलतात, सत्तेची समीकरणे बदलतात; मात्र जनतेच्या प्रश्नांची जबाबदारी आणि पत्रकारितेचे महत्त्व कायम राहते.

मुरबाड नगरपंचायतीच्या कारभाराबाबत पत्रकारांना काय माहिती आहे, किती माहिती आहे आणि कोणत्या कामांबाबत प्रश्न उपस्थित करायचे आहेत, हे पत्रकारांना शिकवण्याची गरज नाही. सार्वजनिक कामांचा अभ्यास करणे, कागदपत्रे तपासणे, विकासकामांची वस्तुस्थिती जाणून घेणे आणि जनतेच्या पैशाचा हिशेब मागणे, हा पत्रकारितेचा अविभाज्य भाग आहे.

नगराध्यक्षपदाच्या काळात कोणती विकासकामे झाली, कोणत्या कामांवर किती निधी खर्च झाला, कोणत्या ठेकेदारांना कामे देण्यात आली, कामांची गुणवत्ता काय होती, नकाशे व मंजुरीच्या प्रक्रियेत नियमांचे पालन झाले का आणि खर्चाच्या तुलनेत प्रत्यक्ष काम किती झाले, असे प्रश्न विचारणे पत्रकाराचा अधिकार आहे. या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कागदपत्रांतून आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीतून मिळाले पाहिजे. कामकाज स्वच्छ असेल, तर त्याचा पुरावा समोर ठेवा; काही त्रुटी असतील, तर त्यांचे स्पष्टीकरण द्या. पण पत्रकारालाच शहाणपण शिकवून प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करू नका.

मुरबाडच्या माजी नगराध्यक्षांनी हे समजून घ्यावे की, पत्रकारांना तुमच्या कारभाराबाबत काय माहिती आहे, याचा अंदाज केवळ तुमच्या समजुतीवरून बांधता येणार नाही. पत्रकार कागदपत्रे वाचतो, नोंदी तपासतो, नागरिकांशी संवाद साधतो आणि आवश्यक तेव्हा प्रश्न उपस्थित करतो. त्यामुळे पत्रकाराला कमी लेखण्यापेक्षा आपल्या कामाचा हिशेब पारदर्शकपणे देण्याची तयारी ठेवा.

आज पत्रकाराला कंपनीत नोकरी करण्याचा सल्ला देताना तुम्हाला पत्रकारितेचे मोल समजत नसेल, तर उद्या पत्रकारांनी तुमच्या सार्वजनिक कामकाजावर प्रश्न उपस्थित केले, तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचीही तयारी ठेवा. पत्रकारितेचा आवाज एखाद्या व्यक्तीच्या नाराजीने थांबत नाही. पत्रकाराचा स्वाभिमान एखाद्याच्या पैशाने विकत घेता येत नाही. आणि सत्याच्या आधारे उपस्थित केलेले प्रश्न केवळ पदाच्या जोरावर संपवता येत नाहीत.

ज्या दिवशी पत्रकार तुमच्या कामकाजाचा सखोल अभ्यास करून तथ्यांसह प्रश्न विचारतील, त्या दिवशी पत्रकारितेची ताकद काय असते, याची जाणीव अधिक प्रकर्षाने होईल. तेव्हा पत्रकाराला कंपनीत काम करण्याचा सल्ला देण्यापेक्षा स्वतःच्या कामाचा हिशेब देणे अधिक महत्त्वाचे ठरेल. कारण पत्रकाराच्या लेखणीची खरी ताकद व्यक्तीला घाबरवण्यात नसते, तर सत्य जनतेसमोर आणण्यात असते.

माजी नगराध्यक्ष महोदय, तुम्ही तुमच्या कष्टाने मोठे झाला असाल, तर त्याचा आम्हाला विरोध नाही. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला असाल, तर त्याचाही मत्सर नाही. परंतु तुमची प्रगती झाली म्हणून पत्रकाराने त्याचा स्वाभिमान बाजूला ठेवावा, स्वतःचा व्यवसाय सोडावा किंवा तुमच्या विचारांशी सहमत व्हावे, अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. पत्रकारिता हा आमचा छंद आहे, आमची ओळख आहे, आमचा स्वाभिमान आहे आणि समाजाप्रती असलेली आमची बांधिलकी आहे.

आम्हाला पत्रकारिता सोडण्याचा सल्ला देण्यापेक्षा तुम्ही केलेल्या कामांबद्दल प्रश्न विचारण्याची संधी द्या. कोणती कामे उत्तम झाली, कोणत्या कामांत त्रुटी राहिल्या, कुठे खर्च झाला आणि जनतेला त्याचा किती फायदा झाला—यावर चर्चा होऊ द्या.

पत्रकाराला तुमच्याबद्दल चांगलेही माहिती असू शकते आणि प्रश्न उपस्थित करण्यासारख्या बाबीही माहिती असू शकतात. पण पत्रकाराने काय लिहावे, काय विचारावे आणि कोणत्या विषयाचा पाठपुरावा करावा, हे ठरवण्याचा अधिकार त्याच्या विवेकाला आणि पत्रकारितेच्या मूल्यांना आहे; कोणत्याही व्यक्तीच्या अहंकाराला नाही.

शेवटी माजी नगराध्यक्षांनी एवढेच लक्षात ठेवावे—पत्रकाराला सल्ला देण्यापूर्वी पत्रकारितेचा आदर करायला शिका. पत्रकाराच्या व्यवसायावर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी सार्वजनिक जीवनातील आपल्या कामांचा हिशेब द्यायला शिका. आणि स्वतःला मोठे समजण्यापूर्वी लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्यांचे महत्त्व ओळखायला शिका.कारण पत्रकार हा कोणाचा लाचार नाही. तो कोणाच्या पैशावर आपला स्वाभिमान गहाण ठेवत नाही. त्याची लेखणी ही जनतेच्या प्रश्नांसाठी आहे. पत्रकारिता आमचा अभिमान आहे, आमची ताकद आहे आणि आमची ओळख आहे.

म्हणून माजी नगराध्यक्ष महोदय, पत्रकारांना शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या कामातून शहाणपण दाखवा. पत्रकारांना कंपनीत काम करण्याचा सल्ला देण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्या. कारण पदाचा कार्यकाळ संपतो, गाड्या बदलतात, पैसा कमी-जास्त होतो; पण सत्याच्या बाजूने उभ्या राहिलेल्या लेखणीचा स्वाभिमान सहजासहजी संपत नाही!

                                                 लेखक - कुणाल शेलार, मुरबाड 


No comments