स्व. अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्या प्रमोद हिंदुराव यांचे निवेदन
गौरव शेलार / मुंबई
:
महाराष्ट्राच्या सामाजिक,
राजकीय आणि सार्वजनिक जीवनात मोलाचे योगदान देणारे दिवंगत
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान
करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष
डॉ.प्रमोद हिंदुराव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व अल्पसंख्याक विकास विभागाच्या मंत्री
सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात
राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सत्ता आणि प्रशासनाच्या
माध्यमातून शेती,
सहकार, पायाभूत सुविधा, ग्रामीण
विकास तसेच महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने काम केले.
त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा योग्य सन्मान व्हावा, अशी
भावना या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी केलेल्या
कार्याची योग्य दखल घेणे आवश्यक आहे. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा गौरव
करण्यासाठी त्यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करणे उचित ठरेल, असे डॉ.प्रमोद हिंदुराव यांनी निवेदनात नमूद केले आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो. या
पुरस्काराच्या माध्यमातून अजितदादांच्या कार्याचा गौरव होण्याबरोबरच राज्याच्या
विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची कृतज्ञतापूर्वक नोंद घेतली जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
अजितदादा पवार यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या
दृष्टीने शासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती डॉ.प्रमोद
हिंदुराव यांनी केली आहे. आता या मागणीवर राज्य शासन काय भूमिका घेते आणि
अजितदादांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याबाबत कोणता निर्णय घेतला
जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



No comments