मुरबाडमध्ये वाळूमाफियांचा हैदोस! डोईफोडी नदीपात्र पोखरले; तलाठ्यांना नदीपात्रच दिसेना?
नामदेव
शेलार / मुरबाड : मुरबाड
तालुक्यातील न्याहाडी, सावर्णे पाठोपाठ आता
शिदाची उमरोली येथील डोईफोडी नदीपात्रातही मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरू
असल्याचा आरोप होत आहे. शासनाच्या वाळू उपशावरील निर्बंधांना धाब्यावर बसवून
नदीपात्रातून वाळू उपसली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू असताना, महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे,
संबंधित तलाठ्यांनी पाहणी करूनही नदीपात्र दिसले नसल्याचे
सांगितल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिल्याचे समजते.
मुरबाड
तालुक्यातील विविध नदीपात्रांमध्ये वाळू उपशाचे प्रकार सुरू असल्याचे आरोप वारंवार
समोर येत आहेत. न्याहाडी आणि सावर्णे येथील प्रकारांनंतर आता डोईफोडी नदीपात्रातील
शिदाची उमरोली परिसरातही मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याचा आरोप
नागरिकांकडून केला जात आहे. शेकडो ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाळू काढली जात
असल्याची चर्चा असून, या प्रकाराला आळा
घालण्यासाठी महसूल विभाग नेमकी कोणती कारवाई करीत आहे, असा
सवाल उपस्थित होत आहे.
नदीपात्रातील
वाळू ही पाण्याच्या नैसर्गिक साठवणुकीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते.
यंदा पावसाने लवकर माघार घेतल्याने मुरबाड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण
होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर
वाळू उपसा झाल्यास पर्यावरणीय समतोल आणि भूजल पातळीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त
केली जात आहे.
एकीकडे
नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता असताना दुसरीकडे नदीपात्राची
अशा प्रकारे हानी होत असल्याचे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे प्रशासनाने केवळ आश्वासन
न देता प्रत्यक्ष पाहणी करून अवैध वाळू उपशावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तलाठ्यांच्या उत्तराने संशयाला उधाण!
शिदाची
उमरोली येथील डोईफोडी नदीपात्रातील वाळू उपशाबाबत मिल्हे सजाचे तलाठी यांच्याकडे
विचारणा करण्यात आली. त्यावेळी, “मी शिदाची उमरोली येथे जाऊन आलो; परंतु मला तेथे
नदीपात्र दिसले नाही,” असे त्यांनी सांगितल्याचा दावा
करण्यात आला आहे.
या
उत्तरामुळे संबंधित परिसरात नेमकी पाहणी कशी करण्यात आली, नदीपात्रातील वाळू उपशाच्या तक्रारींची
पडताळणी झाली का आणि अवैध उत्खनन आढळल्यास कोणती कारवाई करण्यात आली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत
नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
या
प्रकरणी तहसीलदारांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, चौकशी कधी होणार, नदीपात्राची
प्रत्यक्ष मोजणी केली जाणार का आणि अवैध वाळू उपसा झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर
कोणती कारवाई होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नदीपात्रातील
वाळू उपशाच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे ही प्रशासनाची
जबाबदारी आहे. वाळू तस्करीचे आरोप खरे असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी आणि
आरोप चुकीचे असल्यास त्याबाबतही स्पष्टता यावी. नदीसंपत्तीचे संरक्षण आणि महसूल
विभागाच्या कामकाजातील पारदर्शकता या दोन्ही बाबींसाठी प्रशासनाने तातडीने पावले
उचलण्याची गरज आहे.

.jpeg)

No comments