मुरबाडच्या देवगाव जिल्हा परिषद शाळेचा ठाणे जिल्ह्यात डंका! शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान
गौरव शेलार / मुरबाड
:
जिल्हा परिषद शाळांचा विद्यार्थी पट घसरत असताना मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद
केंद्र शाळा देवगावने मात्र शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विविध
नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर यशाची नवी उंची गाठली आहे. शाळेच्या या
उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन
सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्याचे शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे यांच्या
हस्ते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षक आणि गुणवंत
विद्यार्थ्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
या गौरव सोहळ्यात देवगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र शंकर केंबारी यांचा
जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी म्हणून सन्मान करण्यात
आला. तसेच साहित्यिक,
दिग्दर्शक आणि विविध शैक्षणिक उपक्रमांत अग्रेसर असलेले शिक्षक एकनाथ देसले यांना
उत्कृष्ट कार्याबद्दल ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून गौरविण्यात आले. मिशन भरारी परीक्षेत
संपूर्ण मुरबाड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून इस्रोवारी करण्याचा बहुमान
मिळवणाऱ्या भार्गव अनंत
टोले या विद्यार्थ्याचाही शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
करण्यात आला.
सन २०१९ मध्ये देवगाव शाळेची विद्यार्थी पटसंख्या १४९
होती. मात्र,
शिक्षकांनी घेतलेली मेहनत, पालकांचा वाढता विश्वास
आणि गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे २०२६ पर्यंत ही पटसंख्या २५१ वर पोहोचली.
इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा जवळच असतानाही जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थ्यांचा
ओढा वाढत राहणे, ही शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि
बदलत्या कार्यपद्धतीची पावती मानली जात आहे.गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड यांचे
मार्गदर्शन व विशेष लक्ष, सन २०१९ पासून कार्यरत शिक्षकांचे
योगदान, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत
देवगावचे सरपंच व सदस्य, ग्रामस्थ, सामाजिक
संस्था आणि दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्यामुळे शाळेचा कायापालट घडवून आणणे शक्य
झाले.
देवगाव शाळेने शैक्षणिक उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांच्या
कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. जिल्हा परिषदेच्या बालनाट्य
स्पर्धेत सलग तीन वर्षे अव्वल स्थान मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी शाळेने केली
आहे. मनोरंजनातून आनंददायी शिक्षण देण्याच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये
आत्मविश्वास,
सर्जनशीलता आणि संघभावना विकसित होण्यास मदत झाली.मिशन भरारी
उपक्रमातून इस्रोवारीचा मान मिळवणारा विद्यार्थी, नवोदय
विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी, तसेच
चौथी, पाचवी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र
ठरलेले विद्यार्थी हे शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे ठरले आहेत.
याशिवाय विकसित भारत, वी स्कूल आणि विविध स्पर्धांमध्येही
विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे.
लेझीम, कवायत, विविध मैदानी
खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर
देण्यात आला. या उपक्रमांमुळे पालकांचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि
त्यांनी आपल्या पाल्यांना देवगाव जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्यास प्राधान्य दिले.शाळेच्या
प्रगतीमध्ये माजी प्रभारी मुख्याध्यापक अन्सारी, माजी
प्रभारी मुख्याध्यापक एकनाथ देसले, सध्या कार्यरत प्रभारी
मुख्याध्यापिका दीपश्री ईसामे, माजी शिक्षक निळकंठ व्यापारी
व नितीन घागस तसेच सध्या कार्यरत असलेले विलास शिंदे, नंदिनी
सरनोबत, पौर्णिमा भोईर, प्रतिमा
नागरगोजे, श्रद्धा पाटील, तुकाराम
नागरगोजे आणि कविता भांडे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
शाळेत शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उभारण्यासाठी
शिक्षकांसोबत पालक,
ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि दानशूर
व्यक्तींनीही पुढाकार घेतला. शाळेच्या विकासासाठी सर्वांनी दिलेले योगदान आजच्या
सन्मानाच्या रूपाने सार्थकी लागल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.सन्मान
सोहळ्यात आयडॉल शिक्षक एकनाथ देसले यांनी देवगाव शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख
मांडला. विद्यार्थी पटसंख्येतील वाढ, स्पर्धांमधील यश आणि
शैक्षणिक गुणवत्तेतील सुधारणा यांचा आढावा घेत त्यांनी शाळेच्या यशामागील सामूहिक
प्रयत्न अधोरेखित केले.
संपूर्ण जिल्ह्यात एकाच शाळेतील शाळा
व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि विद्यार्थ्याचा
अशा प्रकारे गौरव होणे, ही देवगावसाठी अभिमानाची बाब ठरली
आहे. लोकसहभाग, शिक्षकांची मेहनत आणि
पालकांचा विश्वास यांच्या बळावर जिल्हा परिषद शाळाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे
प्रभावी केंद्र बनू शकते, हे देवगाव शाळेने आपल्या
कामगिरीतून दाखवून दिले आहे.



No comments