web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडमध्ये ११ ते २१ ऑक्टोबरदरम्यान भव्य नवरात्रोत्सव; दांडिया, गरबा, होम मिनिस्टरसह विविध कार्यक्रमांची मेजवानी!

 

गौरव शेलार / मुरबाड : स्व. धर्मवीर आनंद दिघे साहेब युवा प्रतिष्ठान, मुरबाड यांच्या वतीने नवरात्रोत्सव २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ११ ऑक्टोबर ते बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मुरबाड शहरातील खुले नाट्यगृह प्रांगणात हा उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. या नवरात्रोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसह दांडिया, गरबा, भजन, विविध स्पर्धा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, रविवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आगमन सोहळा आयोजित करण्यात आला असून, सायंकाळी भजन सेवा आणि रात्री गरबा नृत्याचा कार्यक्रम रंगणार आहे. सोमवार १२ ऑक्टोबर रोजी भजन सेवा व गरबा नृत्य, तर मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी भजन सेवा आणि गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार १४ ऑक्टोबर आणि गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी हरिपाठ सेवा, भजन सेवा व गरबा नृत्याने उत्सवात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

शुक्रवार १६ ऑक्टोबर आणि शनिवार १७ ऑक्टोबर रोजीही हरिपाठ सेवा व गरबा नृत्याचे कार्यक्रम होणार आहेत. रविवार १८ ऑक्टोबर रोजी लहान मुलांसाठी होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीच्या हे विशेष आकर्षण असणार आहे. सोमवार १९ ऑक्टोबर रोजी भजन सेवा, गोविंद-जय गोविंदेश्वर प्रासादिक भजन मंडळाचा कार्यक्रम, फॅन्सी ड्रेस आणि रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.मंगळवार २० ऑक्टोबर रोजी दसरा आणि विजयादशमीच्या निमित्ताने हरिपाठ सेवा, गरबा नृत्य तसेच आकर्षक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता भव्य विसर्जन सोहळ्याने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपत महिला, युवक आणि बालकांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. आकर्षक सजावट, भक्तिमय वातावरण आणि मनोरंजनाच्या विविध उपक्रमांमुळे मुरबाडकरांसाठी हा नवरात्रोत्सव विशेष पर्व ठरण्याची अपेक्षा आहे. “मुरबाडकरांसाठी खास आकर्षक कार्यक्रमांची मेजवानी” अशी या नवरात्रोत्सवाची ओळख निर्माण करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

या भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन माजी नगराध्यक्ष राम दुधाळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून, मुरबाडकरांसाठी धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची खास मेजवानी सज्ज झाली आहे. नऊ दिवसांच्या उत्सवात भजन, गरबा, दांडिया, होम मिनिस्टर, खेळ पैठणीच्या यांसह विविध स्पर्धा आणि आकर्षक बक्षीस वितरणाचे कार्यक्रम रंगणार आहेत.मुरबाडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक माजी नगराध्यक्ष राम दुधाळे यांनी केले आहे.

 

 

No comments