web-banner-lshep2024

Breaking News

ठाणे जिल्हा बँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी दिनेश कथोरे

 

गौरव शेलार / बदलापूर : ठाणे जिल्हा बँक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी दिनेश कथोरे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे सहकार आणि बँक कर्मचारी क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून, या माध्यमातून कर्मचारी, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आपली निवड आमदार किसन कथोरे (आप्पा) यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनामुळे झाली असल्याचे दिनेश कचोरे यांनी सांगितले. “कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आम्ही कथोरे परिवार नेहमी समाजाच्या हितासाठी काम करत आलो आहोत. आप्पांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे आणि परिपूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे,” असे त्यांनी सांगितले.

सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांसाठी सातत्याने काम करत राहणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी झटणे, हीच आमदार किसन कथोरे यांनी दिलेली शिकवण आहे, असेही कथोरे यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत पदासाठी नव्हे, तर जनतेच्या हितासाठी काम केले आणि त्याच कामाची ही अध्यक्षपदाच्या रूपाने मिळालेली शाबासकीची थाप असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

“मला पदाची अपेक्षा कधीच नव्हती. मात्र लोकांच्या हितासाठी सातत्याने काम करत आलो. त्याचे फळ म्हणून आज ही जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे या पदाकडे सन्मानापेक्षा मोठी जबाबदारी म्हणून पाहतो,” असे दिनेश कथोरे यांनी YML न्यूजशी बोलताना सांगितले.

अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बँक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र काम करण्याचा निर्धार कचोरे यांनी व्यक्त केला. कर्मचाऱ्यांच्या अडचणी, त्यांच्या हक्कांचे प्रश्न तसेच सहकार क्षेत्राशी संबंधित बाबी प्रभावीपणे मांडण्याचे काम आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करणे ही आपली कायमची भूमिका राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षपद मिळाले म्हणून आतापर्यंतच्या जबाबदाऱ्या बाजूला न ठेवता, त्या अधिक पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडण्यावर आपला भर राहील, असे कथोरे यांनी सांगितले.

दिनेश कथोरे यांच्या निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नव्या जबाबदारीतून कर्मचारी आणि समाजहितासाठी ते कोणती भूमिका बजावतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

No comments