ठाणे ग्रामीण पोलिसांचा युवकांसाठी कौशल्य विकासाचा उपक्रम; १९ रोजगाराभिमुख प्रशिक्षण अभ्यासक्रमांची संधी
गौरव
शेलार / भिवंडी : ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आणि प्रथम एज्युकेशन
फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पडघा पोलीस ठाणे हद्दीतील युवक-युवतींसाठी कौशल्य
विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण व
आदिवासी भागातील युवकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या
संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या
प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह टू-व्हीलर टेक्निशियन, ऑटोमोटिव्ह फोर-व्हीलर सर्व्हिस असिस्टंट,
ब्युटी थेरपिस्ट, सीएनसी मशीन ऑपरेटर, फ्लोअर सीलिंग व ड्रायवॉल इंस्टॉलर, असिस्टंट
इलेक्ट्रिशियन, जनरल ड्युटी असिस्टंट, गवंडी-काम,
मल्टी फंक्शनल ऑफिस असोसिएट, प्लंबिंग-वॉटर
डिस्ट्रिब्युशन सिस्टम टेक्निशियन, सोलर पीव्ही इंस्टॉलर,
शेफ, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस, फूड प्रोडक्शन, हाऊसकीपिंग, वेल्डिंग,
ग्राफिक डिझायनिंग आणि फोर्कलिफ्ट ऑपरेटर अशा विविध रोजगाराभिमुख
अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
अभ्यासक्रमानुसार
प्रशिक्षणाचा कालावधी साधारणपणे ४५ ते ६० दिवसांचा असून काही अभ्यासक्रमांचा
कालावधी ९० दिवसांपर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रमानुसार दहावी, बारावी किंवा पदवीधर अशी आहे.
विशेष
म्हणजे सर्व प्रशिक्षण विनामूल्य असून प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार
नाही. कौशल्य प्रशिक्षणाची संधी आणि शंभर टक्के नोकरीची हमी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी प्रत्येक अभ्यासक्रमात
मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुक युवक-युवतींनी वेळेत नोंदणी करणे आवश्यक
आहे.
२९ सप्टेंबरला मार्गदर्शन व प्रवेशासाठी विशेष कार्यक्रम
या
प्रशिक्षणाबाबत माहिती, मार्गदर्शन आणि
प्रवेशासाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला
आहे. हा कार्यक्रम गुजर हॉल, नवी वस्ती, बोरीवली, पडघा पोलीस स्टेशन, ता.
भिवंडी, जि. ठाणे येथे होणार आहे.
प्रशिक्षणासाठी
इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे,
गुणपत्रिका, शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला,
आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा पॅनकार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि बँक पासबुकची झेरॉक्स अशी आवश्यक कागदपत्रे
सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कौशल्य, संधी आणि सुरक्षित भविष्य या उद्देशाने
राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा आणि
प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी साधावी, असे आवाहन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आणि प्रथम एज्युकेशन
फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments