web-banner-lshep2024

Breaking News

म्हसा रोडवरील ‘गार्डन प्लॉट’वर गाळे उभारणीचा संशय; परिसरातील सोसायट्या गार्डन असुरक्षित नगरपंचायतीच्या परवानग्यांवर प्रश्नचिन्ह!

नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड शहरातील म्हसा रोड वरील शिवनेरी रेस्ट हाऊस लगतच्या परिसरातील गार्डन प्लॉटवर कथितरीत्या गाळ्यांचे बांधकाम करण्यात आल्याची चर्चा असून, या प्रकरणाने आता मुरबाड नगरपंचायतीच्या बांधकाम परवानगी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर बांधकामासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या नेमक्या कोणत्या निकषांवर देण्यात आल्या, त्या कोणत्या अधिकाऱ्याने मंजूर केल्या आणि संबंधित बांधकामाचा मंजूर नकाशा व इतर कागदपत्रे कोणती आहेत, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

मुरबाड शहरामध्ये असलेली गार्डन असुरक्षित असून ते बिल्डर्सनी गिळगूत केली आहेत. जेष्ठ नागरिक,लहान मुलं नागरिकांना गार्डन ही वास्तू आता दुर्मिळ झाली आहेत. नगरपंचायतीने ज्या गार्डनची कामे करून गटारी रस्त्यांवर शासनाचा निधी खर्च केला त्याचा लोकांना काय फायदा झाला याचे आत्मपरीक्षण लोकप्रतिनिधी यांनी करायला हवे. ज्या सुभो सोसायटी ठेकेदारांनी कामे केली त्याची चौकशी करून नगररचना विभागनी कारवाई करावी अन्यथा मुरबाडकर जनआंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

गार्डन प्लॉटचा मूळ वापर काय? त्या जागेवर व्यावसायिक गाळे उभारण्यास नियमांनुसार परवानगी आहे का? बांधकाम आराखडा मंजूर आहे का? बांधकाम परवानगी, वापर परवानगी तसेच आवश्यक त्या इतर विभागांच्या ना-हरकत प्रमाणपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नगरपंचायत प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे.

सामान्य नागरिकांसाठी वेगळे नियम, धनदांडग्यांसाठी वेगळे?

मुरबाड शहरात एखाद्या सामान्य नागरिकाला आपल्या मालमत्तेवर कायदेशीर बांधकाम करण्यासाठी परवानगी घ्यायची झाल्यास अनेक कागदपत्रे, नियम आणि प्रक्रियांचा सामना करावा लागतो. मात्र, प्रभावशाली किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना नियमांची अडचण राहत नाही का? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.सामान्य नागरिकांच्या परवानगीच्या अर्जांकडे वारंवार नियम व कागदपत्रांच्या नावाखाली पाहिले जाते; मग काही निवडक बांधकामांच्या बाबतीत प्रशासनाची भूमिका वेगळी का दिसते, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

नगरपंचायतीने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रत्यक्ष जागेची पाहणी करावी आणि उपलब्ध सर्व परवानग्या व मंजूर आराखड्यांची पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बांधकाम नियमबाह्य अथवा विनापरवानगी असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित बांधकामावर नियमानुसार तातडीने कारवाई करावी.

दुसरीकडे, जर सदर बांधकामास सर्व कायदेशीर परवानग्या देण्यात आल्या असतील, तर त्या कोणत्या नियमांच्या आधारे देण्यात आल्या याचा खुलासा नगरपंचायतीने करावा, अशीही मागणी होत आहे.आता म्हसा रोडवरील या कथित गाळे बांधकामाची फाईल कोणाच्या टेबलवरून मंजूर झाली? नियमांचे पालन झाले आहे की नियमांना बगल देण्यात आली? याचे उत्तर नगरपंचायत प्रशासनाने जनतेला देणे गरजेचे आहे. चौकशी होऊन सत्य समोर येईपर्यंत या प्रकरणाकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी मुरबाडकरांची मागणी आहे.

No comments