web-banner-lshep2024

Breaking News

घरकुल वाटपात घोळ झाल्याचा दावा;मुरबाड पंचायत समितीच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गंभीर आरोप; चौकशीची मागणी

गौरव शेलार / मुरबाड : मुरबाड पंचायत समितीच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ने गंभीर आरोप केले असून, मागील १० ते १२ वर्षांपासून पंचायत समितीची आमसभा घेण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील घरकुल योजनांच्या लाभार्थी निवडीतही मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.

या दोन्ही प्रकरणांची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक अशोक वाघचौडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास १ ऑक्टोबर २०२६ पासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार पंचायत समितीची आमसभा दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला घेणे अपेक्षित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, मुरबाड पंचायत समितीच्या आमसभा मागील अनेक वर्षांपासून झालेल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आमसभा घेऊन नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, २०२१ ते २०२६ या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांची ग्रामपंचायतीनिहाय यादी जाहीर करावी, तसेच प्रत्येक लाभार्थ्याची पात्रता, निकष आणि अपात्र ठरविण्यामागील कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील १२६ ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेच्या पात्र व अपात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. गरजू आणि पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिले असून, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना घरकुलाचा लाभ मिळाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, प्रशासन या आरोपांवर कोणती भूमिका घेते आणि संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाते का, याकडे मुरबाड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

No comments