web-banner-lshep2024

Breaking News

एमडी ड्रग्ज, गांजा, गुटखा तसेच इतर अवैध धंद्यांना उधाण; पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

गौरव शेलार / ठाणे : ठाणे जिल्ह्यात एमडी ड्रग्ज, गांजा, गुटखा तसेच इतर अवैध धंद्यांना उधाण आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहारामुळे विशेषतः तरुण पिढीच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, या परिस्थितीवर पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारने कठोर भूमिका घेण्याची मागणी होत आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच अशा प्रकारचे अवैध धंदे वाढत असल्याचे चित्र दिसत असल्याने, हे धंदे रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात ड्रग्जसह विविध अवैध व्यवसायांवर अधूनमधून पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, एखादी कारवाई झाल्यानंतर काही दिवसांत पुन्हा त्याच प्रकारचे व्यवहार सुरू होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या अवैध धंद्यांच्या मुळाशी असलेल्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, बाहेरील पोलिस पथके येऊन अमली पदार्थांवर कारवाई करतात, अशा घटना समोर येत असतील तर स्थानिक पोलीस यंत्रणेला या व्यवहारांची माहिती का मिळत नाही? स्थानिक पातळीवरील गुप्तचर यंत्रणा नेमकी काय करत आहे? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर देण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, या अवैध धंद्यांना नेमका कोणाचा ‘वरदहस्त’ आहे? स्थानिक पातळीवर कोणाच्या आशीर्वादाने हे व्यवहार सुरू आहेत का? याची चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाले आहेत. मात्र, या कथित अवैध व्यवसायांमागील सूत्रधार कोण, याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही.

ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातच एमडी, गांजा, गुटख्यासारख्या अवैध धंद्यांचा विळखा वाढत असेल, तर ही प्रशासनासाठी गंभीर बाब नाही का? असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.

अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई अडकण्यापूर्वी प्रशासनाने ‘मूळावर घाव’ घालून कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच अंबरनाथ-बदलापूर-वांगणी परिसरातील कथित अवैध धंद्यांची स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

No comments