web-banner-lshep2024

Breaking News

मातानगरातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; श्री गजानन एचपी गॅस एजन्सीचा मनमानी कारभार

गौरव शेलार  / मुरबाड : मुरबाड शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी प्रवासी, वाहनचालक तसेच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मातानगर येथील मुख्य महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर तर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

मातानगर परिसरातील श्री गजानन एचपी गॅस एजन्सी येथे गॅस सिलिंडर घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दी होत असते. या वेळी ग्राहकांची वाहने रस्त्यालगत उभी राहत असल्याने रस्त्याची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असल्याची तक्रार स्थानिक वाहनचालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना मार्ग काढताना अडचणी निर्माण होतात. विशेषतः गर्दीच्या वेळेत या ठिकाणी वाहतूक कोंडी वाढत असल्याने नागरिकांचा वेळ वाया जात असून, आपत्कालीन वाहनांनाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर श्री गजानन एचपी गॅस एजन्सीला संबंधित विभागांकडून कोणत्या निकषांच्या आधारे परवानगी अथवा ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले, याची प्रशासकीय पातळीवर पडताळणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. एजन्सीच्या ठिकाणी ग्राहकांची वाहने उभी राहत असतील तर त्यासाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था आहे का, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी कोणत्या अटी घालण्यात आल्या आहेत, तसेच त्या अटींचे पालन केले जात आहे का, याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मुरबाड नगरपंचायत तसेच वाहतूक पोलिस प्रशासनाने या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून वाहतूक कोंडीची कारणे तपासावीत, रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी आणि संबंधित श्री गजानन एचपी गॅस एजन्सीच्या परवानगी व ना-हरकत प्रमाणपत्राची पडताळणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

 “एका व्यवसायामुळे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल तर प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. नियम सर्वांसाठी समान असावेत,” अशी भावना वाहनचालक व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून श्री गजानन एचपी गॅस एजन्सीला देण्यात आलेल्या परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्र आणि संबंधित वाहतूक सुरक्षेच्या अटींची तपासणी करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी आणि मातानगर परिसरातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आता मुरबाड नगरपंचायत आणि वाहतूक पोलिस प्रशासन या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि प्रत्यक्ष कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments