मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त व स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त मुरबाड तालुक्यात "एक गाव एक आधारवड" अभियानाचा शुभारंभ
गौरव
शेलार / मुरबाड : ठाण्याचे
जिल्हाधिकारी श्रीकृष्ण
पांचाळ यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि मुरबाड विधानसभा
मतदारसंघाचे आमदार किसन
कथोरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या "छत्रपती
शिवाजी महाराज महाराजस्व अभियान" अंतर्गत "एक
गाव – एक आधारवड" या महत्त्वाकांक्षी पर्यावरण संवर्धन
अभियानाचा शुभारंभ मंगळवारी मुरबाड तालुक्यातील म्हसा, जामघर,
सासणे, कळमखांडे आणि माणिवली (शि.) या
गावांमध्ये आधारवडाच्या वृक्षारोपणाने करण्यात आला.
राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या
जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे आणि तहसील कार्यालय,
मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून,
पर्यावरण संरक्षणाला लोकसहभागाची जोड देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न
या माध्यमातून करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक गावात किमान एक आधारवड वृक्ष लागवड करण्याची
संकल्पना मांडली आहे. आमदार किसन
कथोरे यांच्या सहकार्याने मुरबाड तालुक्यात हा उपक्रम प्रभावीपणे
राबविण्यात येत असून,
तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या
कार्यक्षेत्रातील गावांसाठी आधारवडाची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
अभियानाच्या पहिल्या
टप्प्यात म्हसा, जामघर,
सासणे, कळमखांडे आणि माणिवली (शि.) येथे
वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुरबाड तालुक्यातील सर्व २०७ महसुली गावांमध्ये "एक गाव – एक आधारवड" या संकल्पनेनुसार वृक्षलागवड केली जाणार आहे.
प्रत्येक वृक्षाचे जिओ-टॅगिंग
करून त्याची ऑनलाइन नोंद ठेवण्यात येणार असून, वृक्षांचे
नियमित संगोपन आणि संवर्धन करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या अभियानाअंतर्गत
मुरबाड तालुक्यात एकूण
२५० आधारवड वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. हवामान बदलाच्या
पार्श्वभूमीवर हरित क्षेत्र वाढविणे, पर्यावरणाचा समतोल राखणे,
जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि भावी पिढ्यांसाठी समृद्ध नैसर्गिक
वारसा निर्माण करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी सर्जेराव मस्के
पाटील यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीत आधारवड हा
दीर्घायुष्य, स्थैर्य, संरक्षण आणि
सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानला जातो. प्रत्येक गावातील हा वृक्ष पर्यावरण
संवर्धनाचा कायमस्वरूपी संदेश देणारा ठरेल.
महसूल विभागामार्फत
राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित नसून "लागवड
ते संवर्धन" या संकल्पनेवर आधारित आहे. प्रत्येक वृक्ष
जगविण्यावर विशेष भर दिला जाणार असून ग्राम महसूल अधिकारी, महसूल
कर्मचारी, ग्रामपंचायती, स्थानिक
स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था तसेच
ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप धारण करेल,
असा विश्वास आमदार किसन
कथोरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या
अभियानाचाच एक भाग म्हणून दि.
२८ जुलै २०२६ रोजी माऊली गार्डन, मुरबाड येथे
"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर" आयोजित करण्यात आले आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या
शुभहस्ते होणाऱ्या या शिबिरात महसूल विभागाच्या विविध सेवा, दाखले,
प्रमाणपत्रे तसेच नागरिकांच्या विविध समस्यांचे तात्काळ निराकरण
करण्यात येणार आहे.
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अभिजीत देशमुख यांनी
मुरबाड तालुक्यातील नागरिकांनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून
शासनाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.



No comments