web-banner-lshep2024

Breaking News

सर्वसामान्यांसाठी पारदर्शकपणे काम करा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

कुणाल शेलार/ठाणे : शासन आणि प्रशासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी असून प्रत्येक अधिकाऱ्याने पारदर्शकपणे आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल,भूसंपादन,मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.बैठकीला आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे,माधवी नाईक,विक्रांत पाटील,कुमार आयलानी,जितेंद्र आव्हाड,विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल,जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने,जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील तसेच जिल्ह्यातील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या विविध कामांचा संगणकीय सादरीकरणाद्वारे आढावा दिला.

यावेळी मार्गदर्शन करताना बावनकुळे म्हणाले की, शासनाच्या योजना आणि सेवा शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे. काम करताना पारदर्शकता आणि मानवी दृष्टिकोन ठेवावा.अनावधानाने झालेल्या चुका समजून घेतल्या जातील,मात्र जाणूनबुजून केलेला निष्काळजीपणा किंवा गैरप्रकार सहन केले जाणार नाहीत,असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील रस्त्यांची मोजणी व सीमांकनाची कामे २६ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कामकाजाचे कौतुक करत ठाणे जिल्ह्यात पुढील काळातही लोकाभिमुख आणि प्रभावी कामे होतील,असा विश्वास व्यक्त केला.

No comments