web-banner-lshep2024

Breaking News

माळशेज घाटात एसटीचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४५ प्रवाशांचे जीव वाचले

 

गौरव शेलार /  मुरबाड  : माळशेज घाटातील धोकादायक वळणांवरून प्रवास करत असताना एका एसटी बसचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने मोठा अपघात टळल्याची घटना घडली. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले. 

या घटनेमुळे काही काळ घाट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस नियमित फेरीवर असताना माळशेज घाटातील उताराच्या भागात चालकाच्या निदर्शनास बसचे ब्रेक व्यवस्थित काम करत नसल्याचे आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत चालकाने घाबरून न जाता अत्यंत धाडसाने आणि शिताफीने बसवरील नियंत्रण कायम ठेवले.

घाटातील तीव्र वळणे आणि खोल दऱ्यांच्या पार्श्वभूमीवर क्षणाक्षणाला धोका वाढत असताना चालकाने बस सुरक्षित ठिकाणी नेऊन थांबवली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. बसमधील प्रवाशांनीही चालकाच्या धाडसाचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक केले.घटनेनंतर प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक प्रवाशांनी देवाचे आभार मानत चालकाचे अभिनंदन केले. "चालकाने वेळेवर योग्य निर्णय घेतला नसता तर मोठी जीवितहानी झाली असती," अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

दरम्यान, या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या वाहनांच्या तांत्रिक तपासणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. घाटमाथ्यासारख्या अतिधोकादायक मार्गांवर धावणाऱ्या बसांची नियमित आणि काटेकोर तपासणी व्हावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

No comments