web-banner-lshep2024

Breaking News

"नळ आले, पाणी गायब; अर्धी कामे, पूर्ण बिल! जल जीवन मिशन भ्रष्टाचाराचा ‘मोरक्या’ मयूर नामक कोण? - भाग 3

 

गौरव शेलार /  मुरबाड  : तालुक्यात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, अनेक गावांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामांनंतरही नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता, निकृष्ट दर्जाची कामे आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत.

या संपूर्ण प्रकरणात वारंवार चर्चेत येणारे नाव म्हणजे मयूर नामक व्यक्ती. स्थानिकांमध्ये त्याला या योजनेचा ‘मोरक्या’ म्हणून संबोधले जात असल्याची चर्चा असून, त्याच्या देखरेखीखाली अथवा प्रभावाखाली अनेक कामे झाल्याचा दावा आंदोलनकर्ते करत आहेत. त्यामुळे "जल जीवन मिशनचा मोरक्या मयूर नामक कोण?" हा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

अनेक गावांमध्ये घराघरांत नळजोडण्या देण्यात आल्याचा दावा केला गेला. मात्र प्रत्यक्षात नळ आहेत, पाईपलाईन आहे, पण पाणी नाही, अशी अवस्था असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे दाखविले जात असताना नागरिकांच्या नशिबी मात्र कोरडे नळ आले आहेत.

काही ठिकाणी पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्याचा आरोप आहे, तर काही ठिकाणी जलस्रोतांची कामे अर्धवट ठेवण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विहिरी, टाक्या आणि जलवाहिन्यांची कामे पूर्ण न करताच बिले मंजूर झाली का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.ग्रामस्थांच्या आरोपानुसार अनेक ठिकाणी विहिरींची कामे पूर्ण झाली नसताना संबंधित कामांची बिले पूर्ण काढण्यात आली आहेत. काही ठिकाणी जलसाठा व्यवस्था अपूर्ण आहे, तर काही ठिकाणी तांत्रिक दोष कायम आहेत. मात्र कागदोपत्री सर्व काही सुरळीत असल्याचे दाखविले जात असल्याची चर्चा आहे.

जर कामे अपूर्ण असतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी मोजमाप कसे केले? बिले मंजूर कोणी केली? कामांची गुणवत्ता तपासली का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.या कथित भ्रष्टाचाराविरोधात विविध गावांतील नागरिकांनी आंदोलने केली, निवेदने दिली, उपोषणे केली. काही ठिकाणी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेधही केला. मात्र एवढे होऊनही संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई झाल्याचे चित्र दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.उपोषणादरम्यान दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरली का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. कारण अनेक ठिकाणी कामांची परिस्थिती पूर्ववत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

जल जीवन मिशन ही केंद्र आणि राज्य शासनाची महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट असलेल्या या योजनेत जर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील, तर ते सरकारच्या प्रतिमेलाही धक्का देणारे ठरू शकतात.

मुरबाड तालुक्यातील कामांबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे "हा भ्रष्टाचार सरकारला लाजिरवाणा ठरणार नाही ना?" असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.जल जीवन मिशनच्या नावाखाली झालेल्या कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर येणार की प्रकरण पुन्हा दडपले जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. (क्रमशः)


No comments