web-banner-lshep2024

Breaking News

नागपुरात बनावट नोटांच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 7 आरोपी जेरबंद


गौरव शेलार/ नागपूर : अधिक चलनी नोटा तयार करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 05 ने धडक कारवाई करत सात जणांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 20 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग चौकीसमोरील एका कार्यालयात ही टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. संबंधित टोळी चारपट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत असल्याची खात्री झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.

छाप्यादरम्यान आरोपींकडे 500 रुपयांच्या नोटांचे बंडल, बनावट व्यवहारासाठी वापरले जाणारे साहित्य, मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच वाहने आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून 500 रुपयांच्या 498 नोटा, विविध कंपन्यांचे मोबाईल, डेल कंपनीचा लॅपटॉप, बोलेरो जीप व होंडा सिटी कार असा एकूण 20.04 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 256/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(3), 318(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काहींवर यापूर्वी फसवणूक, अपहार, खून, एनडीपीएस तसेच मोका कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या टोळीचे आणखी दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 05 चे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत.

No comments