"मयूराच्या पिसाऱ्याआड जल जीवन मिशनचा महाभ्रष्टाचार?" ठेकेदार मालामाल, जनता तहानलेली! - भाग – २
गौरव
शेलार / मुरबाड : केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन
योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याचा असला, तरी मुरबाड तालुक्यात या योजनेच्या
अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च
झाल्याचा दावा केला जात असताना अनेक गावांतील नागरिक आजही नियमित
पाणीपुरवठ्यापासून वंचित असल्याची तक्रार करत आहेत.
शिंदगाव-आनंदनगर
परिसरात जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि
भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी नुकतेच उपोषण आंदोलन छेडले
होते. या आंदोलनामुळे प्रशासन आणि संबंधित यंत्रणा खडबडून जागी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आंदोलनाच्या वेळी आणि
त्यानंतर घडलेल्या घटनांनी अनेक नवीन प्रश्न निर्माण केले आहेत.
उपोषणस्थळी ठेकेदारांची ‘रिंग’; कारवाईची भीती की जनतेची काळजी?
स्थानिक
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उपोषण सुरू असताना संबंधित कामांशी निगडित ठेकेदार आणि त्यांचे प्रतिनिधी
मोठ्या संख्येने सक्रिय झाले होते. कामांतील त्रुटी, निकृष्ट
दर्जा आणि अपूर्ण सुविधांबाबत नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची थेट उत्तरे
देण्याऐवजी आश्वासनांची मालिका सुरू करण्यात आली.
ग्रामस्थांचा
आरोप आहे की, जनतेचा रोष शांत
करण्यासाठी आणि संभाव्य चौकशी किंवा कारवाई टाळण्यासाठी विविध आश्वासने देण्यात
आली. मात्र यापैकी किती आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण होणार आणि किती कागदावरच
राहणार, याबाबत नागरिक साशंक आहेत.
‘आका’ कोण? मयूर नावाभोवती
चर्चांचे वादळ
मुरबाड
तालुक्यातील जल जीवन मिशनच्या कामांमध्ये ‘मयूर’ नावाच्या व्यक्तीचा प्रभाव
असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. अनेक कामांमध्ये निर्णयप्रक्रियेवर प्रभाव
टाकणारा हा ‘आका’ नेमका कोण, असा प्रश्न गावोगावी विचारला जात आहे. प्रशासनाने या चर्चांची सत्यता
तपासून जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी
नागरिकांकडून होत आहे.
कोट्यवधींची कामे, पण नळात पाणी कुठे?
योजनेसाठी
मोठा निधी खर्च झाल्याचे दाखवले जात असताना अनेक ठिकाणी जलवाहिन्या अपूर्ण, टाक्या वापराविना, तर
काही ठिकाणी तांत्रिक दोषांमुळे पाणीपुरवठा सुरळीत नसल्याच्या तक्रारी आहेत.
त्यामुळे “कागदावर योजना पूर्ण आणि प्रत्यक्षात जनता पाण्यावाचून त्रस्त” असे
चित्र निर्माण झाल्याचा आरोप होत आहे.
चौकशीची मागणी तीव्र
ग्रामस्थांनी
जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या सर्व कामांचे तांत्रिक लेखापरीक्षण (ऑडिट), निधी खर्चाची चौकशी आणि संबंधित अधिकारी व
ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. उपोषणानंतर दिलेल्या
आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन
छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
जल
जीवन मिशन ही जनतेच्या जीवनाशी संबंधित योजना आहे की काही ठरावीक लोकांच्या आर्थिक
फायद्याचे साधन बनली आहे?कोट्यवधी रुपये
खर्चूनही जर नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसेल, तर जबाबदार
कोण? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शिंदगावच्या
उपोषणानंतर दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरतील की पुन्हा एकदा जनतेच्या पदरी
निराशाच पडणार? (क्रमश)



No comments